एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जुन्नर : शिवजन्मभूमीचा मतदारसंघ यावेळी कुणाला कौल देणार?
शिवजन्मभूमी म्हणजे किल्ले शिवनेरीच्या पायथ्याचा मतदारसंघ म्हणजे जुन्नर, मागील निवडणुकीत जुन्नरच्या मतदारांनी महाराष्ट्रातला मनसेचा एकमेव खासदार निवडून दिला, आता ते शिवसेनेत परतलेत. तर शिवसेना सोडून आलेले डॉ. अमोल कोल्हे खासदार झाले. त्यामुळे जुन्नरचे मतदार पक्षाला कौल देणार की व्यक्तीला हा कळीचा प्रश्न आहे.
जुन्नर हा शिवछत्रपती महाराजांच्या जन्मभूमीने पावन असलेला मतदार संघ. सुरुवातीपासू या मतदार संघावर आघाडीची पकड होती. पण अलीकडच्या काळात ही पकड ढिली झाली. म्हणूनच की काय, इथल्या मतदारांनी २०१४ च्या विधानसभेत पहिल्यांदाच मनसेच्या शरद सोनवणे यांना कौल दिला. त्याआधी म्हणजे २००९च्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वल्लभ बेनके यांना जुन्नरच्या मतदारांनी पसंती दिली होती. या दोन्ही विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आशा बुचके या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे आमदार सोनवणे सेनेत दाखल झाले तर भूमिपुत्र डॉ अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदारकी मिळवल्यानंतर जुन्नरमध्येही अनेक उलथा-पालथ झाल्या. शिवसेनेच्या आशा बुचके यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. त्यामुळे कोण, कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल यावर मतदार तर्क-वितर्क लढवतायेत.
जुन्नर विधानसभा मतदार संघ पुणे-नाशिक आणि कल्याण-अहमदनगर या दोन्ही महामार्गाच्या दुतर्फा पसरलाय. छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला शिवनेरी गड, जीवधन गड, हडसर गड, नाने घाट असा ऐतिहासिक ठेवा या मतदार संघाला लाभलाय. ग्रामीण भागात विखुरलेल्या या मतदार संघात कांदा, टोमॅटो, द्राक्ष, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. अशा या मतदारसंघात म्हणावा तसा विकास साधण्यात विद्यमान आमदार कमी पडलेत.
२००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे शिवाजीराव आढळरावांना दिल्ली दरबारी पाठवणारा इथला मतदार, २००९ आणि २०१४ च्या विधानसभेत मात्र शिवसेनेच्या उमेदवाराला नाकारताना पहायला मिळाला. २००९ च्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या वल्लभ बेनके यांच्या पारड्यात मतदारांनी मतं दिली अन शिवसेनेच्या आशा बुचके पराभूत झाल्या. २०१४ च्या विधानसभेत मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारलं अन शरद सोनवणेंच्या रूपाने मनसेचा राज्यातला एकमेव आमदार निवडून दिला. यावेळी ही आशा बुचके यांना पराभव चाखावा लागला. पराभवाची दुहेरी सल दूर करण्यासाठी बुचकेंनी गेली पाच वर्ष कंबर कसली, पण २०१९च्या लोकसभेपूर्वी विद्यमान आमदार सोनवणे शिवसेनेत दाखल झाले. तेव्हा आशा बुचकेंना हे सहन न झाल्याने त्यांनी थेट मातोश्रीवर आगपाखड केली. पण त्याचा काहीच फरक न पडल्याने, सोनवणेंना डोक्यावर बसवणाऱ्या खासदार आढळरावांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बुचकेंनी इंगा दाखवला. भूमिपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हेंची जादू आणि त्यातच बुचकेंनी ही छुपा पाठिंबा दिला. परिणामी ४१ हजार ५५१ मतांची आघाडी कोल्हेंना मिळाली. आढळरावांच्या याच पराभवाचा ठपका ठेवत शिवसेनेने आशा बुचके यांची हकालपट्टी केली. आता बुचके कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार की अपक्ष नशीब अजमावणार यावर सध्या मतदार तर्क-वितर्क लढवतायेत. कोल्हेंना छुपी मदत केल्याने बुचके राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांना धडकी भरलीय.
२०१९ च्या शिरूर लोकसभेतील जुन्नर विधानसभेत पक्षनिहाय मिळालेली मतं
शिवाजीराव आढळराव (शिवसेना) - ७१ हजार ६३१
डॉ अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस) - १ लक्ष १३ हजार १८२ (विजयी)
इंजिन सोडून शिवबंधन स्वीकारलेले विद्यमान आमदार शरद सोनवणेंना या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. पण सोनवणेंची कारकीर्द खूपच वादग्रस्त आहे. त्यांच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झालेत. महिला पोलिसाला धमकावणे, टोल नाका बंद केल्याचा आरोपाचा यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सोनवणेंची विधानसभेची ही लढाई खडतर असेल अशी चिन्ह आहेत. आता आशा बुचके राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील ही लढत दुरंगी होईल. अन्यथा बुचके अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या तर जुन्नरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळेल
व्हिडिओ : वारी लोकसभेची
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
राजकारण
Advertisement