(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्री हेमंत सोरेनांचा पराभव करणाऱ्या आमदाचा भाजपला रामराम, झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच झारखंड मुक्ती मोर्चाने (JMM) भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या तीन माजी आमदारांनी झारखंड मुक्ती मोर्चात प्रवेश केला आहे.
Jharkhand Assembly Election 2024 : महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्ये देखील विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. याच पार्श्वभूमीवर झारखंडमध्येही राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच झारखंड मुक्ती मोर्चाने (JMM) भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या तीन माजी आमदारांनी झारखंड मुक्ती मोर्चात प्रवेश केला आहे. यामध्ये लुईस मरांडी (lois marandi), कुणाल सारंगी आणि लक्ष्मण तुडू यांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वीच, तीन वेळा भाजपचे आमदार राहिलेले केदार हाजरा आणि AJSU पार्टी पक्षाचे उमाकांत रजक यांनी देखील JMM मध्ये प्रवेश केला होता. अशातच भाजपचे माजी आमदार लुईस मरांडी यांनीही JMM प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर अनेक आरोप केले आहेत.
JMM ला फायदा
लुईस मरांडी यांनी झारखंडमधील दुमका मतदारसंघातून तीनदा निवडणूक लढवली आहे. 2014 च्या निवडणुकीतही त्यांनी हेमंत सोरेन यांचा पराभव केला होता. त्यामुळं त्यांच्या पक्ष प्रवेशाचा पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो. याशिवाय दुमकाच्या आसपासच्या जागांवरही JMM फायदा होऊ शकतो. लुईस मरांडी यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांचे स्वागत केले आहे. आम्ही भाजपचे माजी उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते आदरणीय लुईस मरांडी यांचे जेएमएम परिवारात मनापासून स्वागत करतो असे सोरेन यांनी म्हटलं आहे.
भाजपवर का होते नाराज?
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि AJSU ने नुकतीच उमेदवारांची यादी जाहीर केली होती. सुनील सोरेन यांना दुमका मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी दिल्याने पक्षात नाराजी असल्याचे बोलले जात होते. त्यामुळं लुईस मरांडी यांनी JMM मध्ये प्रवेश केला. सोमवारी त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेत JMM मध्ये प्रवेश केला.