HP Election 2022: जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांचा स्वत:च्या राज्यातच पराभव, जेपी नड्डांनी हिमाचल गमावलं
Himachal Pradesh Election Results 2022: जेपी नड्डा यांच्या होमग्राऊंडवरच भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय. काँग्रेसनं हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापनेच्या दिशेनं पाऊल टाकलेय.
Himachal pradesh Assembly Election 2022: गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा (HP Elections 2022) निवडणुकीत बहुमत जवळपास निश्चित झाले आहे. गुजरातमध्ये भाजपने (BJP Gujrat) सत्ता कायम राखली आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसनं बाजी मारली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने (HP Congress) तब्बल 39 जागांवर (Himachal Pradesh Election Results 2022) आघाडी घेतली आहे. तर भाजपला 26 जागांवर आघाडी आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला 43.9 टक्के मतं मिळाली आहेत तर भाजपला 43 टक्के मते मिळाली आहेत. हिमाचल प्रदेशचा (HP Election 2022) पराभव भाजपला जिव्हारी लागणारा आहे, कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांचे हिमाचल प्रदेश होम ग्राऊंड आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रचारात कोणताही कसर सोडली नव्हती. पण स्वत:च्या राज्यात नड्डा यांना भाजपला विजय मिळवून देण्यात अपयश आलेय. हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता राखण्यासाठी भाजपनं पूर्ण प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह स्टार प्रचार हिमाचल प्रदेशमध्ये प्रचारासाठी मैदानात उतरले होते. पण भाजपला सत्ता राखण्यात अपयश आले, काँग्रेसनं बाजी मारली आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये पराभव का झाला?
हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री बदलण्याची मागणी भाजपमध्ये होती, पण पक्षानं याकडे दुर्लक्ष केले. अंतर्गत कलहाचा फटका भाजपला हिमाचल प्रदेशमध्ये बसल्याचे जाणकरांचं मत आहे. भाजपचे स्टार प्रचारक केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मंत्री हिमाचल प्रदेशमध्ये तळ ठोकून होते. तरिही भाजपला सत्ता राखण्यात अपयश आले. गुजरातमध्येही मुख्यमंत्री बदलावरुन भाजपमध्ये कलह होता, भाजपने गुजरातमध्ये विजय रुपाणी यांच्याऐवजी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केले, याचा फायदा भाजपला झाल्याचं दिसलं. पण हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री न बदलल्याची चूक भाजपला महागात पडल्याचे तज्ज्ञांचं मत आहे.
पोटनिवडणुकीत भाजपला बसला होता फटका -
गेल्यावर्षी हिमाचल प्रदेशमध्ये खासदार आणि आमदाराकीची पोटनिवडूक झाली होती. यामध्ये भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. खासदारकीची एक जागा आणि आमदारकीच्या तिन्ही जागेवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसने चारही जागेवर बाजी मारली होती. या पराभवानंतर भाजपमधून मुख्यमंत्री बदल करण्याची मागणी उठली होती. पण याकडे भाजपच्या हायकमांडने दुर्लक्ष केलं. याचाच फटका विधानसभा निकालानंतर भाजपला बसलाय, अशी चर्चा सुरु आहे.