Gujarat Election Result 2022 : सगळे प्रकल्प पळवले, मग एकतर्फी निकाल लागणारच, गुजरात निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रिया
Gujarat Election Result 2022 : अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे जातील याची काळजी घेण्यात आली, त्याचा हा परिणाम होणार हे सर्वांना माहिती होतं, अशा शब्दात शरद पवार यांनी गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
Gujarat Election Result 2022 : "गुजरातची निवडणूक (Gujarat Election Results) एकतर्फी होईल याबद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेतले गेले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे जातील याची काळजी घेण्यात आली, त्याचा हा परिणाम होणार हे सर्वांना माहिती होतं," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar reaction on Gujarat Results 2022) यांनी गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते मुंबईत (Mumbai) बोलत होते.
शरद पवार म्हणाले, "देशात एक वेगळं वातावरण आहे नुकतेच निवडणुका पार पडल्या. या निवडणुका एक वेगळी दिशा दाखवायला लागली आहे. गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल याबद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेतले गेले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे जातील याची काळजी घेण्यात आली. त्याचा हा परिणाम होणार हे सर्वांना माहिती होतं, तसा निकाल आता पाहायला मिळत आहे. पण गुजरातचा निकाल लागला याचा अर्थ देशात एका बाजूने मतप्रवाह आहे असा नाही. कारण दिल्ली महापालिकेत भाजपची सत्ता आपने खेचून आणली"
भाजप सत्ता गमावतंय, हळूहळू बदल होतोय
"हिमाचल मध्ये भाजपचं राज्य होतं त्या ठिकाणी आता काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या आहेत. भाजपचं राज्य गेलं आहे. दिल्लीमध्ये गेलं, पंजाबमध्ये देखील गेलं आहे आणि आता हिमाचलमध्ये देखील राज्य गेलं आहे. याचा अर्थ हळूहळू आता बदल व्हायला लागला आहे. राजकारणात अनेक वेळा पोकळी असते. गुजरातची पोकळी भाजपने भरुन काढली आणि दिल्लीची पोकळी केजरीवालांनी भरुन काढली. देशातील अनेक लोकांना बदल हवे आहेत, याची नोंद राजकीय कार्यकर्त्यांना घ्यायला हवी. ही पोकळी कशी भरुन काढायची याचा विचार करायला हवा. ही पोकळी आता लवकरच भरुन काढण्यासाठी आपण तयारीला लागलं पाहिजे. आता आपल्याला एकत्र येऊन राजकारण करणे गरजेचे आहे. आपण कमीत कमी भाजपच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध असणाऱ्या शक्ती एकत्रित कशा करायच्या याची तयारी केली पाहिजे," असं शरद पवार म्हणाले.
निवडणुका लांबणीवर, पण दुर्लक्ष नको
विरोधी पक्षांच्या मीटिंगसाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेतला, इथे देखील आपण पुढाकार घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत, हेच आता कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवं की आपण ही पोकळी भरुन काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी सर्वांनी तयार राहिलं पाहिजे. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत म्हणून दुर्लक्ष करायला नको. आपण आपलं काम चालूच ठेवलं पाहिजे. या निवडणुकीत नवी पिढी कशी आणता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. ही निवड करताना शक्यतो त्या ठिकाणचा जो तरुण कार्यकर्ता आहे त्याला डावलू नये, त्याला संधी दिली पाहिजे. निकाल पार पडल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात यायला हवं की राष्ट्रवादीने दुसरी फळी तयार केली आहे, असं शरद पवार म्हणाले.
मराठी बांधवा लोकशाही माध्यमातून न्याय मिळायल हवा
अनेक वेळा सीमा प्रश्नावर चर्चा झाली. त्या ठिकाणी ज्या मागण्या आहेत त्याला तिथल्या जनतेचा आधार आहे. लोकांचा तो निर्णय आहे हे आता देशासमोर सिद्ध करण्याची वेळ आली आहे. या भागात मराठी प्राबल्य कमी दिसावं यासाठी योजनाबद्ध प्रयत्न सुरु आहेत. मराठी आणि कानडी यांच्यामध्ये वाद नाही ती सुद्धा एक राज्याची भाषा आहे. तिथे असलेल्या मराठी बांधवांना न्याय मिळायला हवा आणि तो लोकशाहीच्या माध्यमातून मिळायला हवा. परंतु दुर्दैवाने तिथल्या सरकारने वेगळी भूमिका घेतली आहे. आता अधिवेशन जवळ येत आहे. उद्याच कर्नाटकमध्ये अधिवेशन पार पडणार आहे, ते बंगळुरुला नाही तर बेळगावला पार पडणार आहे.
मुंबईत कधीही मराठी सक्ती केली नाही
मुंबईसारख्या ठिकाणी गुजराती शाळा अनेक आहेत, बंगाली शाळा आहेत, उर्दू शाळा आहेत, अन्य भाषिकांच्या देखील शाळा आहेत. मात्र या ठिकाणी कधीही मराठीची सक्ती करण्यात आली नाही. मातृभाषा हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे तो आपण मान्य केला आहे. ते सूत्र कर्नाटकने मान्य करावं एवढी साधी मागणी आहे, परंतु त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करण्यात येत आहे
केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही
केंद्रानं सीमा प्रश्न अजूनही लक्ष दिले नाही. संसदेत सुप्रिया सुळे यांना याबाबत उठवला. त्यावेळी अध्यक्षांनी सांगितलं हा दोन्ही राज्यांचा विषय आहे. मात्र एक राज्य कायदा हातात घेत असेल तर केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, त्यांनी यातून मार्ग काढायला हवा. हा प्रश्न सीमेपुरता मर्यादित होता मात्र आता कोणी गुजरातला जायचं म्हणत आहे, कोणी आणखी दुसऱ्या राज्यात जायचं म्हणत आहे. मी सोलापूरचा अनेक वर्ष पालकमंत्री होतो तिथं अनेक भाषिक लोक राहतात परंतु आता आज कर्नाटकचे मुख्यमंत्री ठिकठिकाणी महाराष्ट्रातल्या बाबींवर हक्क सांगत आहेत. सांगली जिल्ह्याचा विषय काढण्याचे कारण नव्हतं. गुजरातचा विषय देखील या ठिकाणी नव्हता. मला भुजबळ साहेबांना सांगायचं आहे. गुजरातमध्ये जाण्यासंदर्भात काही लोकांना निर्णय घेतला आहे. त्याचा पुढाकार घेणारा राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष होता. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार आहे जर आपल्या पक्षाच्या काही लोक फुटीरवाद्यांना साथ देत असतील तर नागरिकांमध्ये याबाबत काय संदेश जाईल, याची काळजी स्थानिक आमदारांना घ्यायला हवी.
माझी मागील दोन दिवसांपासून मराठी एकीकरण समितीसोबत चर्चा सुरु आहे. त्यांनी मला आता सांगितला आहे की आता त्यांच्या घरासमोर लावलेला फौजफाटा हटवण्यात आला आहे. सर्वपक्षीय मोर्चा आपल्याला यशस्वी करायचा आहे. शिवछत्रपतींची प्रतिष्ठा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आपल्याला जपायचा आहे. त्यासाठी सर्वांना एकत्र येणे गरजेचे आहे. चुकीच्या गोष्टी महाराष्ट्रात होऊ देणार नाही, याची जाणीव आपल्याला करुन द्यायची आहे. केंद्र सरकारने अजूनही राज्यपालांच्या बाबतीत निर्णय घेतलेला नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे निर्णय
हिंदुस्थानला लोकशाही पद्धतीने उभं करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान कारणीभूत ठरले आहे. त्यांनी लिहिलेलं संविधान हे ऐतिहासिक काम आहे. त्यांच्याकडून इतरही महत्त्वाची धोरणे राबवली गेली होती. अनेकांना याबाबत माहिती नाही. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांचं राज्य असताना एक मंत्रिमंडळ स्थापन झालं होतं. त्या मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकर मंत्री होते. त्यांच्याकडे त्यावेळी खातं देण्यात आलं होतं जलसंवर्धन. अनेकांना माहिती नाही पाण्यासंबंधीच्या देशातलं नियोजन पॉलिसी डॉक्टर आंबेडकरांनी केली आहे. देशातील सर्वात मोठ्या भाकरा नांदगल धरणाचा निर्णय आंबेडकरांनी घेतला होता. संविधान महत्त्वाचं आहे त्याशिवाय देखील त्यांची अनेक मोठी कामे आहेत ही बाब राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि ती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे.
VIDEO : Sharad Pawar Full Speech