Amit Shah: अमित शाह एक लाखांहून अधिक मताधिक्क्यानं जिंकले अन् अनेकांचं डिपॉझिट जप्त करत गुजरात विधानसभेत पोहोचले!
भाजपचे उमेदवार अमित शाह यांनी काँग्रेस उमेदवाराचा (Congress Candidate) 1.4 लाख मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला आहे.
Ellisbridge Assembly Election Result 2022: बातमीचं शीर्षक वाचून आपण दचकलात का? पण हे खरंय. कारण अमित शाह (Amit Shah) यांनी गुजरातमधील एलिसब्रिज विधानसभा मतदारसंघातून (Ellisbridge Assembly Seat) दणदणित विजय मिळवला आहे. मात्र हे अमित शाह (Amit Shah News) देशाचे केंद्रीय गृहमंत्री नसून भाजपचे एलिसब्रिजचे नवनिर्वाचित आमदार आहेत. भाजपचे उमेदवार अमित शाह यांनी काँग्रेस उमेदवाराचा (Congress Candidate) 1.4 लाख मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. एलिसब्रिज मतदारसंघ भाजपचा असा बालेकिल्ला मानला जातो. यावेळीही येथे लढत एकतर्फी झाली असून भाजपनं एकहाती बाजी मारली आहे. काँग्रेस वगळता अन्य आठ उमेदवारांचं डिपॉझिट देखील जप्त झालं आहे.
एलिसब्रिज विधानसभा मतदारसंघातून (Gujarat election result 2022) भाजपचे उमेदवार अमितभाई पोपटभाई शहा यांना 1,19,323 मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे भिखुभाई हरगोविंदभाई दवे यांना केवळ 14,527 मते मिळाली. निवडणुकीच्या दंगलीत आम आदमी पक्षाचे उमेदवार पारस रुपेशकुमार शाह यांना 9467 मते मिळाली. एलिसब्रिज विधानसभा मतदारसंघात 9 उमेदवारांनी नशीब आजमावले.
एलिसब्रिज विधानसभा मतदारसंघ एक असा मतदारसंघ आहे जिथे भाजप सातत्याने विजयाचा इतिहास रचत आहे. गेल्या 50 वर्षांपासून काँग्रेसला या जागेवर विजय मिळालेला नाही. 1975 नंतर काँग्रेसचा येथे सातत्याने पराभव होत आहे. अहमदाबाद पश्चिम लोकसभा मतदारसंघात एलिसब्रिज परिसरात 23 वर्षांपासून भाजपने वर्चस्व राखले आहे.
मागील वेळीही मिळवलेला दणदणित विजय
मागील वेळी म्हणजे 2017 साली झालेल्या निवडणुकीत एलिसब्रिज विधानसभा जागेवर भाजपचे शाह राकेशभाई जशवंतलाल शाह यांना 1,16,811 मतं मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे विजयकुमार रतीलाल दवे यांना केवळ 31,606 मते मिळाली. त्यावेळी भाजपने काँग्रेसचा 85,205 मतांनी पराभव केला होता. भाजपचे राकेश शाह 2012 आणि 2007 च्या निवडणुकीत देखील विजयी झाले होते. यंदा तिथं अमित शाह यांना संधी देण्यात आली.
अहमदाबाद पश्चिम लोकसभा मतदारसंघातील एलिसब्रिज विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 2,66,486 आहे. त्यापैकी 133531 पुरुष तर 132951 महिला मतदार आहेत.