Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वसई-विरारमध्ये गुजरातच्या 100 ते 150 बस संशयाच्या भोवऱ्यात; मतदानाच्या काही तासांआधी काय घडलं?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वसई विरारच्या हायवे परिसरात कालपासूनच गुजरात पासिंगच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर उभ्या होत्या.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विरारमध्ये काल झालेल्या कॅशकांड प्रकरणानंतर आता गुजरातच्या बसेस वसई-विरारमध्ये आल्याने बहुजन विकास आघाडीने त्यावर संशय व्यक्त करत, आपला तीव्र आक्षेप नोंदवला आहे. वसई विरारमध्ये जवळपास 100 ते 150 बसेस उभ्या असून, त्या बसेस मतदारांना आणण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे.
वसई विरारच्या हायवे परिसरात कालपासूनच गुजरात पासिंगच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर उभ्या होत्या. रात्रीच्या सुमारास अंधेरी पूर्वचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार यांनी विरारमध्ये उभ्या असलेल्या या गाडयावर संशय व्यक्त करुन, बोगस मतदानासाठी मतदारांची ने आण करण्यासाठी या बसेस मुंबईसह कोकणात जाणार असल्याचा आरोप केला आहे. या बस चालकांकडे कुठे जायचं आहे, कुणाला सोडायचं आहे याबाबत माहिती नव्हती. तसेच प्रवाशी वाहून नेण्याचं परमिट, प्रवाशीची माहिती देखील नव्हती, असा आरोप मनिष प्रकाश राऊत यांनी केला आहे. तर येथील एका प्रवाशांनी आपणाला रत्नागिरीला मतदानाला जायच आहे. बस मिळत नव्हती म्हणून मी या बसमध्ये बसलो असल्याच सांगत, या गाडीत 20 प्रवाशी असल्याची माहिती दिली आहे. बहुजन विकास आघाडीने या बस प्रकरणाची चौकशी करुन गाड्या ताब्यात घ्याव्यात अशी मागणी देखील केली आहे.
मतदानाच्या 90 मिनिटेआधी मॉक पोल-
मतदान मशीन काम करते की नाही हे पाहण्यासाठी मतदान सुरु होण्याच्या 90 मिनिटे आधी मॉक पोल घेण्यात येते. नालासोपारा विधानसभेच्या या निवडणूकीत नालासोपारा पूर्वेच्या राजा शिवाजी विद्यालयात आज पहाटे 5.30 वाजता हा मॉकपोल घेण्यात आला. राजकीय पक्षाचे प्रतिनीधीसमोर ही मतदान चाचणी घेण्यात येते. ईव्हिएम मशिनबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी तसेच मशिन बरोबर चालते का हे पाहण्यासाठी हे मॉक पोल घेण्यात येते. ईव्हिएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशिनमध्ये प्रिंट स्वरुपात सात सेकंद दिसते का याचीही तपासणी केली जाते.
पालघर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज-
पालघर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे. पालघर ,बोईसर, डहाणू, विक्रमगड, नालासोपारा आणि वसई असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. सहा विधानसभा मतदार संघामध्ये 22 लाख 92 हजार इतके मतदार असून एकूण 2278 मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी 12500 अधिकारी कर्मचारी 4000 पोलीस कर्मचारी 2000 होमगार्ड तसेच आठ एसआरपीएफ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.