Gramanchayat Election : राज्यातील 547 ग्रामपंचायतींसाठी 76 टक्के मतदान, सोमवारी निकाल
राज्यातील 51 ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध झाल्या आहेत. इतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात येईल.
मुंबई: राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाले. यात ग्रामपंचायत सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. या ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 12 ऑगस्ट 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात 547 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66.10 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळ उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या सर्व संबंधित ठिकाणी मतमोजणी उद्या होईल.
नंदुरबारमध्ये पाच वाजेपर्यंत 72 टक्के मतदान
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील 149 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. काही मतदान केंद्रावर साडेपाचनंतर देखील मतदानासाठी रांगा असल्याचे दिसून आल्या. त्यामुळे मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या आत असणाऱ्या मतदारांना घेवून मतदान सुरु होते. जिल्ह्यात पाचवाजे पर्यत अंदाज 72 टक्के मतदान झाले असून अंतिम आकडेवारी येण्यासाठी आणखीन काही वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान आज झालेल्या मतदान प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडून आलेला नाही.
राज्यातील 547 ग्रामपंचायतींसाठी अंदाजे 76 टक्के मतदान झालं आहे.
या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं,
नंदुरबार: शहादा- 74 आणि नंदुरबार- 75.
धुळे: शिरपूर- 33.
जळगाव: चोपडा- 11 आणि यावल- 02.
बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 आणि लोणार- 02.
अकोला: अकोट- 07 आणि बाळापूर- 01.
वाशीम: कारंजा- 04.
अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 आणि चांदुर रेल्वे- 01.
यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरेगाव- 11 आणि झरी जामणी- 08.
नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, आणि देगलूर- 01.
हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 आणि पालम- 04.
नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 आणि नाशिक- 17.
पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02.
अहमदनगर: अकोले- 45.
लातूर: अहमदपूर- 01.
सातारा: वाई- 01 आणि सातारा- 08.
कोल्हापूर: कागल- 01.