Goa Election Result : पक्ष मला योग्य जबाबदारी देईल, याबाबत विश्वास : प्रमोद सावंत
Goa Election Result : गोवा सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक होती. या बैठकीनंतर प्रमोद सावंत यांनी एबीपी माझाशी बातचीत केली.
पणजी : माझ्या नेतृत्त्वात ही निवडणूक लढली गेली. आमच्या पक्षात काही मागण्याची गरज नसते. पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतात. मला विश्वास आहे की पक्ष मला योग्य जबाबदारी देईल आणि मी ती पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेन, असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. गोवा सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक होती. या बैठकीनंतर प्रमोद सावंत यांनी एबीपी माझाशी बातचीत केली.
प्रमोद सावंत म्हणाले की, "आज माझ्या सरकारच्या शेवटची मंत्रिमंडळाची बैठक होती. आम्ही मागच्या तीन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला आणि अनेक संकटाताना सामोर जाऊन जनतेची सेवा केली. यात गोव्याच्या जनतेचीही साथ मिळाली, यासाठी आम्ही एक मताने आभार प्रस्ताव पास केला. 14 मार्चला विधानसभा विसर्जित करुन नवीन सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरु करु, त्यासाठीचा ठरावही आज मंजूर झाला.
'पक्ष मला योग्य जबाबदारी देईल'
साखळी मतदारसंघातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सुमारे 450 मतांनी विजय झाला. काँग्रेस धर्मेश सगलानी यांनी इथे चांगली लढत दिली. यावर प्रतिक्रिया देताना प्रमोद सावंत म्हणाले की, "विरोधकांनी माझा पराभव करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले पण गोव्याच्या जनतेने त्यांना उत्तर दिले. माझ्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली. आमच्या पक्षात काही मागण्याची गरज नसते. पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतात. मला विश्वास आहे की पक्ष मला योग्य जबाबदारी देईल आणि मी ती पूर्ण इमानदारीने पार पाडेन."
मगोप बाबत काही नाराजी आहे. पण सर्व पक्षात असे छोटे प्रश्न उपस्थित होतातच, पण याचा अर्थ हे नाही की पक्षात सगळ ठीक नाही. आमचा पक्ष सेंट्रल लीडरशिपच्या आदेशावर चालतो. जो आदेश येईल तो सर्व मान्य करतील, असं प्रमोद सावंत यांनी सांगितलं.
'14 तारखेपर्यंत नवीन सरकार स्थापन करण्याची तयारी'
नवीन सरकार आणि शपथविधीबाबत प्रमोद सावंत म्हणाले की, "14 तारखेपर्यंत नवीन सरकार स्थापन करण्याची तयारी आहे. पण आधी केंद्रातून निरीक्षक येतील, बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये विधीमंडळाचा नेता निवडला जाईल. त्यानंतर राज्यपालांच्या भेट घेऊन वेळ मिळेल. त्या वेळेवर शपथ घेतली जाईल."
गोवा विधानसभेचा अंतिम निकाल
गोवा - एकूण जागा 40
भाजप - 20
काँग्रेस - 11
आम आदमी पक्ष - 2
गोवा फॉरवर्ड पक्ष- 1
अपक्ष - 3
मगोप - 2
रिवोल्यूशनरी गोअन्स पक्ष - 1