Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Maharashtra Politics: महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर दिसत आहे. महायुतीला मोठा फटका बसण्याचा अंदाज. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवारांच्या पराभवाची शक्यता. काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी होणार?
नागपूर: लोकसभा निवडणुकीचे देशातील सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान शनिवारी संपुष्टात आले. यानंतर विविध संस्थांकडून लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. यामध्ये विदर्भातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा (Chandrapur Lok Sabha Constituency) निकाल भाजपच्या सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्याविरोधात जाताना दिसत आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) विजयी होऊ शकतात, असा अंदाज एक्झिट पोल्सनी (Exit Poll) वर्तवविला आहे. यानंतर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची भाषा आणि देहबोली बदलल्याचे दिसून आले. सुधीर मुनगंटीवार यांच्या बोलण्यातून निराशा जाणवू लागली आहे. एरवी सुधीर मुनगंटीवार कोणत्याही मुद्द्यावर किंवा वादविवादात भाजपची बाजू हिरीरीने आणि उत्साहाने मांडताना दिसतात. मात्र, एक्झिट पोलनंतर त्यांचा नूर पालटलेला दिसत आहे.
चंद्रपुरातून निवडणूक लढवण्यासाठी मी तयारच नव्हतो. पक्षाचा आदेश आला म्हणून तयार झालो. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील दोन विधानसभा क्षेत्र ही येतात. या दोन विधानसभा क्षेत्रात माझा फारसा जनसंपर्क नव्हता. तरीही मी लोकसभेची निवडणूक लढविली. मी आधीपासूनच ठरवले होते, "विजय झालं तर माजायचं नाही आणि पराभव झाला तर खचायचं नाही", असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
पराभव झाला तर मी पूर्ण शक्तीने पक्षासाठी काम करेन: सुधीर मुनगंटीवार
जनतेच्या सेवेसाठी निवडणुकीत उभा असून जनतेला वाटलं की, त्यांचे प्रश्न काँग्रेसचा उमेदवार चांगल्याने सोडवू शकतो, तर ते काँग्रेसला निवडून देतील. जनतेने मला संधी दिली तर मी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी जिवापाड काम करेन. मात्र, जनतेने संधी दिली नाही तर जनतेला मलाच निवडून द्या, अशी बळजबरी मी करू शकत नाही.
मी चंद्रपूरबद्दल साशंक नाही. मात्र, निर्णय जनतेला घ्यायचा आहे हे विसरून चालणार नाही.पराभव अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पराभव झाला होता. पराभवानंतर तिघांनी आपले उद्दिष्ट बदलले नाही, नैतिकता सोडली नाही. पराभव झाला तर मी पूर्ण शक्तीने माझ्या क्षेत्रात कामासाठी लागेन, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
देश आला पण महाराष्ट्र गेला
बहुतांश एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला स्पष्टपणे बहुमत मिळताना दिसत आहे. भाजपप्रणित एनडीए आघाडी 350 जागांच्या आसपास मजल मारेल, असा अंदाज आहे. मात्र, महाराष्ट्रातील चित्र पूर्णपणे उलटे दिसत आहे. महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसताना दिसत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रात 41 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत महायुतीला 15 ते 20 जागांचा फटका बसण्याचा अंदाज आहे.
एबीपी सी वोटर एक्झिट पोल
महायुती
भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1
महाविकास आघाडी
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1
एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12