अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत चुरस, उद्या मतदान
निवडणुकीत 2 लाख 56 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी एकूण 73 इमारतींमध्ये 337 मतदान केंद्र असून त्यातील 41 मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आणि 137 संवेदनशील मतदान केंद्र आहेत.
अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. महानगर पालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये 351 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. या निवडणुकीत 2 लाख 56 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी एकूण 73 इमारतींमध्ये 337 मतदान केंद्र असून त्यातील 41 मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आणि 137 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. 1 पोलीस अधीक्षक, 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 6 पोलीस उपअधीक्षकांसह 2 हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून 2 हजार निवडणूक कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करत एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणिकीच्या रिंगणात उतरले आहेत. भारतीय जनता पार्टीने सर्वच्या सर्व म्हणजे 68 जागांवर आपले उमेदवार दिले आहे. विशेष म्हणजे यात 35 महिला उमेदवार भाजपने दिल्या आहेत. तर शिवसेनेने 61 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादीने 46 तर कॉंग्रेसने 21 उमेदवार या निवडणुकीसाठी मैदानात उतरवले आहेत. अहमदनगर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचा पहिला महापौर झाला होता. विशेष म्हणजे आजपर्यंत कुठल्याही पक्षाने 5 वर्षे महापालिकेवर सत्ता केलेली नाही. अडीच वर्षाच्या टर्मनंतर महापौरपदाची निवडणूक घेण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपचे खासदार दिलीप गांधी आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि कॉंग्रेसचे युवा नेते सुजय विखे यांनी या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे कधीही महानगरपालिकेत महापौर पद न मिळवलेल्या भाजपला एकहाती सत्ता मिळणार की राष्ट्रवादी आणि शिवसेना आपला झेंडा रोवणार हे पाहावे लागणार आहे.