(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde Resigned: एकनाथ शिंदेंची नाराजी? स्पष्टीकरण देताना केसरकर म्हणाले, 'पक्षश्रेष्ठींना सांगितलंय जो निर्णय घेतील....'
Eknath Shinde Resigned: नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाच्या आणि शिंदेच्या नाराजीच्या चर्चा सुरू आहेत, त्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते दिपक केसरकर यांनी माध्यमांना माहिती दिली.
मुंबई: शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदेंनी आज राजीनामा (Eknath Shinde Resigned) सोपवला. यावेळी राज्यपालांनी नव्या मुख्यमंत्र्यांची शपथविधी पुर्ण होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची एकनाथ शिंदेंना सूचना केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाच्या आणि शिंदेच्या नाराजीच्या चर्चा सुरू आहेत, त्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते दिपक केसरकर यांनी माध्यमांना माहिती दिली, त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदाबाबतची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांना नव्या मुख्यमंत्र्यांची शपथविधी पुर्ण होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांनी सूचना केली. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिली आहे.
नवे सराकार कधी स्थापन होणार?
तर नवीन सरकार स्थापनेबाबत बोलताना दिपक केसरकर म्हणाले, येत्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल. लवकरच नवीन सरकारची स्थापना होईल. उद्या भाजपची गटनेते पदाबाबत बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील. चर्चा करतील, त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडे जातील. त्यानंतर पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील. त्याप्रमाणे महाराष्ट्राचं सरकार स्थापन होईल. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की, आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा पंरतु तिन्ही पक्षांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, जो निर्णय पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असेल.
ज्यावेळी तिघांना बोलवलं जाईल तेव्हा तिन्ही नेते दिल्लीला जातील. किंवा पक्षश्रेष्ठींनी निरीक्षक पाठवण्याचा निर्णय घेतला तर ते इकडे येतील ही पक्षाची अंतर्गत बाब आहे, त्याबाबत मी कोणतंही भाष्य करू शकत नाही. तिन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला आहे. तिघांचं एकमत आहे, आम्ही एकत्र आहोत. महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीच्या आणि हिताच्या दृष्टीने हे सरकार काम करेल., असंही पुढे केसरकर म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या नाराजीवर दिपक केसरकरांचं वक्तव्य
मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चेवर केसरकर म्हणाले, कोणतीही नाराजी नाही. त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितलं आहे. ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितलं आहे.