(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भुजबळ, भुसे, महाजनांच्या शर्यतीत देवयानी फरांदेंची एन्ट्री, 'भावी पालकमंत्री' म्हणून बॅनर झळकल्यानं भुवया उंचावल्या
Devyani Pharande : गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे यांचे नाव नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी चर्चेत असताना देवयानी फरांदे यांचे भावी पालकमंत्री म्हणून बॅनर झळकले आहे.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालंय तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसलाय. भाजपने (BJP) या निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सध्या राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चा सुरु आहेत तर नाशिकमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दादा भुसे (Dada Bhuse) यांचे नाव नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी चर्चेत असताना देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांच्या कार्यकर्त्यांकडून देवयानी फरांदे यांचे भावी पालकमंत्री असे बॅनर झळकले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्री पद आणि मंत्रिपदाच्या चर्चांना वेग आला आहे. महिला नेत्यांमध्ये अदिती तटकरे, पंकजा मुंडे, मनीषा कायंदे, माधुरी मिसाळ, भावना गवळी, श्वेता महाले यांच्यासह देवयानी फरांदे यांचे मंत्री पदासाठी चर्चेत आले आहे. देवयानी फरांदे यांची मंत्री मंडळात वर्णी लागण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भावी पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.
देवयानी फरांदेंचे बॅनर झळकल्याने चर्चांना उधाण
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात देवयानी फरांदे या तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे वसंत गीते यांचा देवयानी फरांदे यांनी पराभव केलाय. यानंतर आता देवयानी फरांदे यांचे भावी पालकमंत्री असे बॅनर दिसून आले आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे यांचे नाव चर्चेत असतानाच देवयानी फरांदे यांचे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. आता देवयानी फरांदे यांची मंत्रीपदी वर्णी लागणार का? नाशिकच्या पालकमंत्रीपदी कोणाची निवड होणार? याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
भुजबळ, महाजन, भुसेंमध्ये चढाओढ
दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात छगन भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री भूषविले आहे. 2014 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची सूत्र देण्यात आली होती. तर अडीच वर्षांपूर्वी शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यावेळी नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाली होती. अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची पॉवर वापरून दादा भुसे यांना नाशिकचे पालकमंत्री केले होते. आता या तीनही नेत्यांमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदावरून चढाओढ पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा