Video: फडणवीस म्हणाले, मनोज जरांगेंना दिवसांतून तीनवेळा मीच का दिसतो; आता, पाटलांनीही केला पलटवार
मराठा आरक्षणाचा लढा हा 1980 पासून सुरू आहे, त्यासाठीच अण्णासाहेब पाटील यांनी गोळी झाडून आत्महत्या केली.
मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे, त्यामुळे, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा युवक निवडणुकीच्या रणांगणाही उतरणार असल्याचे दिसून येते. याबाबत, 4 नोव्हेंबरपर्यंत आपण आपला निर्णय जाहीर करू, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यातच, पुन्हा एकदा भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या व्हिजन महाराष्ट्र कार्यक्रमातून जरांगे पाटील यांचा रोष आपल्यावरच का, याचे उत्तर त्यांनीच द्यावे, असे म्हटले होते. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षणाचा लढा हा 1980 पासून सुरू आहे, त्यासाठीच अण्णासाहेब पाटील यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर, 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी का मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. गेल्या 32 वर्षांच्या लढाईत मराठा समाजाला मी पहिल्यांदा आरक्षण दिलंय, सारथीची निर्मित्ती आम्ही केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आम्हीच सुरू केलं, आता नरेंद्र पाटील हे या महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे, मराठा समाजासाठी यापूर्वीच्या किंवा महाविकास आघाडीतील नेत्यांनी काय केलं, मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी काय केलं, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमातून विचारला होता. देवेंद्र फडणवीसांच्या या प्रतिक्रियेकवर आता मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली असून पुन्हा एकदा फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
मी बार बार त्यांना बोलतो म्हणजे ते माझे विरोधक शत्रू नाहीत,14 महिने आम्ही फडणवीस यांना सांगितलं होतं की तुम्ही निर्णय घ्या, तुमचं नाव घेतो म्हणजे तुमच्यासारखा विश्वासघातकी या इतिहासात कधी घडला नाही, या भूमीवर देखील कधी आला नसेल इतका विश्वासघाती, असे म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. तुम्हीच वाटोळं केलं, म्हणून तुमचंच नाव घेणार ओबीसींच्या जाती घालता आणि मराठ्यांना आरक्षण देत नाही. पंधराशे पंधराशे मतदानाच्या नावाखाली लोकांना वाटतात आणि बंद ही करतात, लोकांना कर्जमाफी करत नाहीत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढवत नाहीत, अंगणवाडी सेविका शिक्षकांचा प्रश्न तसाच पडलेला आहे, तुम्ही प्रश्न सोडतात तरी कोणते?, असा सवाही मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून केला आहे.
मराठा-ओबीसीमध्ये तुम्ही वाद लावला
मराठा आणि ओबीसी मध्ये तुम्ही वाद लावला. सरकार फोडून तोडून तयार करणारे तुम्हीच आहेत, ज्यांच्या सोबत चाळीस वर्षे पटलं नाही त्यांच्यासोबत खुर्चीसाठी तुम्ही सत्ता बनवली, यात तुम्ही सगळे आरएसएस आणि भाजप नाराज केली, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. मराठा आणि ओबीसी हिंदूच आहेत, या दोघात तुम्ही फूट पाडली. हे तुम्हाला नाही विचारायचं मग कोणाला विचारायचं. ओबीसींना 17 जातींना आरक्षण दिले तेव्हा लिहून घेतलं होतं का तुम्ही?, असा परखड सवालही जरांगे यांनी फडणवीसांना विचारला आहे. ते देणार नाहीत म्हणूनच आम्ही तुम्हाला निवडून आणलं होतं. हिंदूमध्ये अर्धा मराठा आहे, मराठ्यांना का बेदखल केल. आरक्षण न मिळू द्यायला आमच्यातलेच काही मारेकरी आहेत, असे म्हणत सरकारची स्तुती करणाऱ्या काही मराठा आंदोलक व नेत्यांसाठीही मनोज जरांगे यांनी ना न घेता अपशब्द वापरल्याचं पाहायला मिळालं.
2 नोव्हेंबरला निर्णय जाहीर करणार
रात्रं-दिवस उभा राहिल्यामुळे रोज चर्चा होत असून कालपासून त्रास होऊ लागलेला आहे. सकाळी डॉक्टरांनी सलाईन लावली, उपोषणामुळे त्रास होत आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली. सर्व इच्छुक उमेदवारांना माझी विनंती ते उद्या 31 तारखेला मोठी बैठक आहे, इकडे कोणीही येऊ नका. मुस्लिम बांधव बैठकीसाठी मोठ्या संख्येने येणार आहे. मात्र, 2 तारखेपर्यंत कोणी येऊ नका. उद्या बैठक होणार आहे, या बैठकीत समीकरण जुळणार का हे पहावे लागेल. 31 ला निर्णय झाला तरी 1 तारखेला दिवाळी आहे, त्यामुळे 2 तारखेला शक्यतो निर्णय जाहीर करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले.
माझ्या पाठिंब्यासाठी कोणालाही पैसे देऊ नका
02 नोव्हेंबपर्य इकडे कोणी येऊ नये, माझा पाठिंबा घेण्यासाठी कोणी पैसे मागत असेल तर देऊ नका आणि घेतले असेल तर ते माघारी घ्या. मी पैशावर पाठिंबा देतो, असं जर कोणी करत असेल आणि ते जर मला कळालं तर मी त्याला मुद्दाम होऊन पाडणार, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.