Nashik Vidhansabha: देवळालीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी भाऊगर्दी; योगेश घोलपांसह राजश्री अहिरराव मैदानात, सरोज अहिरेंविरोधात थोरले पवार कुणाला संधी देणार?
Nashik Vidhan Sabha Election 2024: नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात तिकीट मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाल्याचं चित्र आहे. माजी आमदार आणि माजी तहसीलदार यांच्यांत उमेदवारीसाठी आता स्पर्धा सुरू झाली आहे.
नाशिक: विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी आपल्या उमेदवारीसाठीची चाचपणी सुरू केली आहे. अशातच नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात तिकीट मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाल्याचं चित्र आहे. माजी आमदार आणि माजी तहसीलदार यांच्यांत उमेदवारीसाठी आता स्पर्धा सुरू झाली आहे. माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी उमेदवारीसाठी शरद पवार यांची भेट घेतली. राजश्री अहिरराव देवळाली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
तर दुसरीकडे या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घोलप हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता असल्याने योगेश घोलप यांच्या पाठोपाठ राजश्री अहरिराव यांनी शरद पवारांची भेट घेतली. महाविकास आघाडीचे तिकटी आपल्याच मिळणार असा विश्वास राजश्री अहिरराव यांनी व्यक्त केला आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्याविरोधात कोण लढणार याबाबत उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अहिरराव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र महायुतीच्या उमेदवार म्हणून सरोज आहिरे यांचे नाव जवळपास पक्के असल्यानं महाविकास आघाडीकडे स्पर्धा वाढली आहे.
माजी मंत्री घोलप यांनी घेतली शरद पवारांची भेट
राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांनी शुक्रवारी (18) शरद पवारांची मुंबईत भेट घेतली. देवळाली विधानसभा मतदारसंघातून आपले पुत्र माजी आमदार योगेश घोलप यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले योगेश घोलप यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांनी पराभव केला. त्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.
त्यानंतर शिवसेनेत झालेल्या बंडानंतर आणि सत्तांतरानंतर माजी मंत्री घोलप यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
त्यामुळे पिता शिवसेनेत आणि पुत्र शिवसेना (उबाठा) पक्षात आहेत. त्यामुळे घोलपांच्या उमेदवारीपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशातच यावर तोडगा काढण्यासाठी बबनराव घोलप यांनी शुक्रवारी थेट शरद पवारांची भेट घेऊन योगेश घोलप यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष किंवा शिवसेना (उबाठा) पक्षाकडून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
किशोर दराडेंनीही घेतली भेट
शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी देखील मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. पुतणे कुणाल दराडेंना येवल्यातून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी आग्रह धरल्याची माहिती आहे.