निकालानंतर चिअर्स.. हायकोर्टाकडून बार मालकांना दिलासा, 4 जून रोजी दारू विक्रीला परवानगी
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वच मतदारसंघात मतदानच्या दिवशी दारुबंदीचे आदेश दिले होते
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या (Election) निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली असून 4 जून रोजी जल्लोष करण्यासाठी सर्वच कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मात्र, कोणाला खुशी तर कोणाला नाराजीचा सामान करावा लागणार आहे. त्यामुळे, कही खुशी, कही गम.. असे वातावरण 4 जून रोजी देशभरात पाहायला मिळणार आहे. त्याच, अनुषंगाने मुंबईत (Mumbai) 4 जून रोजी दारुविक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. मात्र, या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर आज न्यायालयात (Court) निर्णय झाला. त्यामुळे, हायकोर्टातन तळीरामांसाठी गुडन्यूजच आली असल्याचे म्हणता येईल.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वच मतदारसंघात मतदानच्या दिवशी दारुबंदीचे आदेश दिले होते. त्यामुळे, मतदान होईपर्यंत मतदारसंघातील दारुची दुकाने, बार बंद ठेवण्यात आले. शेवटच्या टप्प्यात मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. त्यामुळे, येथील वाईन शॉप, दारु दुकाने, पब यादिवशी बंद ठेवण्यात आले होते. आता, 4 जून रोजी मतमोजणी होत असून त्यादिवशीही दारु दुकाने, वाईन शॉप व पब बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत. याप्रकरणी, दुकानमालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर न्यायालयाने दुकानदारांच्या बाजुने निर्णय दिला.
लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होताच मुंबईतील दारू विक्री खुली करण्यास मुंबईत उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. आहार संघटनेच्या याचिकेवर हायकोर्टाचे आज निर्णय देताना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या अगोदर मतमोजणीच्या दिवशी पूर्ण दिवस 'ड्राय डे' जाहीर करण्यात आला होता. मात्र, या याचिकेच्या माध्यमातून बारमालक व दारुविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला विरोध केला. त्याच अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने 22 मे रोजी ही याचिका दाखल करुन घेतली. त्यावर, आज न्यायालयात अंतिम सुनावणी झाली असून 4 जून च्या निकाला दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर दारुविक्रीला परवानगी देण्यात आली आहे.
असा युक्तिवाद झाला
मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे बेकायदेशीरपणे दारू विक्री होण्याची शक्यता याचिकेतून वर्तवण्यात आली होती. त्यानंतर, न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून घेऊन निर्णय जाहीर केला. मुंबई उच्च न्यायालयात मेसर्स इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने अॅड.विणा थडाणी व अॅड. विशाल थडाणी यांच्यामार्फत दोन स्वंतत्र याचिका केल्या होत्या. या याचिकांवर सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली.
दरम्यान, मुंबईतील मतदान प्रक्रियेदरम्यान 20 मे च्या दोन दिवस आधीच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे, मुंबईत 3 दिवस दारु दुकाने बंद ठेवण्यात आली होती. याचा फटका विक्रेत्यांना बसल्याने 4 जून रोजीच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध त्यांनी न्यायालयात दाद मागितली. विशेष म्हणजे न्यायालयानेही ही याचिका दाखल करुन घेतली. त्यावर, आज निर्णय देताना 4 जून रोजी निकालानंतर दारुविक्रीला परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचा
निकालादिवशी 4 जूनला 'फुल ड्राय डे' असणार की नाही?; हायकोर्टाने याचिका दाखल करुन घेतली, पण...