मुंबईतील महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत रद्द करा, काँग्रेसची मागणी
मुंबईतील महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत रद्द करा, अशी मागणी काँग्रेसकडून नव्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

मुंबई : राज्यात नवं शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर जूनं सरकार असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेनेच्या महाविकास आघाडीला तडे जातात की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारण काँग्रेसकडून ठाकरे सरकारच्या काळात झालेली महापालिका प्रभाग रचना आणि वॉर्ड आरक्षण रद्द करण्यात यावं अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. गेल्या सरकारच्या काळात झालेली प्रभाग रचना एकाच पक्षाचं हित करणारी असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.
मुंबईतील महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत रद्द करा, अशी मागणी काँग्रेसकडून नव्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मुंबईतील प्रभाग रचना, आरक्षण सोडत एकाच पक्षाच्या फायद्याची असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. यापूर्वीही ठाकरे सरकार असतांना शिवसेनेनं स्वत:च्या फायद्यानुसार प्रभारचना केली असल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता. शिंदे-फडणवीसांच्या नव्या सरकारच्या काळातही महाविकास आघाडीतील सहकारी असलेल्या काँग्रेसकडून शिवसेनेवर आरोप होत आहेत.
फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या या प्रभाग रचनेविरोधात अनेक राजकीय आणि अराजकीय विरोध दर्शवणारी जवळपास 800 पत्रे प्राप्त झाली. या पत्रांचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे होते. मात्र तात्कालिक राज्य सरकारने याची कोणतीही दखल घेतली नाही असा आरोप काँग्रेसनं आपल्या पत्रात केला आहे
नव्या प्रभाग रचनेत काँग्रेसचं काय नुकसान झालं? काँग्रेसचे आरोप काय?
- प्रभागांची संख्या 227 वरून 236 करण्यापूर्वी नव्याने जनगणना करणे आवश्यक होते. महानगरपालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेमध्ये 2011 सालच्या जनगणनेकडेदेखील दुर्लक्ष केले आहे.
- काँग्रेस पक्षाने जिंकलेल्या महापालिकेच्या 30 जागांपैकी 20 जागांवरील प्रभाग पुनर्रचनेमुळे बदलले यामुळे काँग्रेसचे नुकसान झाले आहे
- तसेच, काँग्रेसनं जिंकलेल्या 30 जागांपैकी 21 जागांवर महिला आरक्षण पडले आहे
बरेचदा नवं सरकार आल्यानंतर जुन्या सरकारचे अनेक निर्णय बदलले जातात. हा आजवरचा अनुभव आणि राजकारणाचा भाग राहिला आहे. मात्र, जुन्या सरकारमधील सहकाऱ्यांनी आमच्याच सरकारच्या काळातील निर्णय बदला अशी विनंती करणं असे प्रसंग विरळेच आहे.




















