UP Election 2022 : भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरमधून लढणार
भाजपने आज पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात 58 जागांसाठी निवडणूक होत आहे.
UP Election BJP Candidates List 2022 : उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच भाजपने आज पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात 58 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी भाजपने 57 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी निवडणूक होत असून भाजपने दुसऱ्या टप्प्यातील 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. एकूण भाजपने आज 105 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
भाजपने आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दिल्लीत केंद्रीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत 170 जागांवरील उमेदवारांच्या नावासाठी चर्चा झाली होती. अखेर भाजपने 105 नावांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे प्रयागराजच्या सिरातू मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दिल्लीत झालेल्या बैठकीत विद्यमान आमदारांपैकी फक्त 10 टक्केच आमदारांची तिकीटे कट केली जाणार असल्याचा निर्णाय घेण्यात आला आहे. कारण, भाजपच्या काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी राजीनामा देऊन समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजप बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर प्रदेशातील एकूण 403 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा हा 10 फेब्रुवारीला असणार आहे. त्यानंतर 14, 20, 23, 27 फेब्रुवारी त्यानंतर 3 आणि 7 मार्च अशी सात टप्प्यांत मतदान प्रकिर्या पार पडणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूपी, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही राजकीय रॅली आणि रोड शोला परवानगी दिलेली नाही.
उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांपुर्वीच भाजपला जोरदार धक्के बसले आहेत. योगी मंत्रीमंडळातील राजीनामा दिलेले मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत मौर्य यांनी प्रवेश केला. त्यानंतर अखिलेश यादव यांच्या हस्ते त्यांना पक्षाचे सदस्यत्व देखील देण्यात आले आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले धर्म सिंह सैनी यांनीदेखील समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यांच्याबरोबरच बृजेश प्रजापती, भगवती प्रसाद सागर, मुकेश वर्मा, रोशन लाल वर्मा, विनय शाक्य, अपना दल चे चौधरी अमर सिंह, युसुफ अली, नीरज मौर्य, हरपाल सैनी शामिल यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले दारा सिंह चौहान यांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. दारा सिंह चौहान हे 16 जानेवारीला आपल्या समर्थकांसह समाजवादी पार्टीत प्रवेश करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: