लोकसभेला 4 लाखांपेक्षा जास्त मतं घेणाऱ्या भारती कामडी ऐनवेळी शिंदे गटात; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: ऐन विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना उबाठाला पालघर जिल्ह्यात मोठं खिंडार पडलं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वंच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याचदरम्यान ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना उबाठाला पालघर जिल्ह्यात मोठं खिंडार पडलं आहे. पालघर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला शिवसेना शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि शिवसेना उबाठाच्या लोकसभा निवडणूक 2024 च्या उमेदवार भारती कामडी (Bharti Kamdi) यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालघर सह संपर्कप्रमुख वैभव संखे आणि उपनेते जगदीश धोडी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला.
कोण आहेत भारती कामडी?
- भारती कामडी यांना लोकसभा निवडणुकीत चार लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती.
- पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारती कामडी यांची 2020 मध्ये निवड झाली.
- पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून भारती कामडी यांनी दीड वर्ष काम केलं.
- सध्या त्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा ठाकरे गटाच्या महिला संघटिका आहेत.
- सातत्याने सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या कामडी यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर होते.
- भारती कामडी कामाचा ठसा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उमटवला आहे.
2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत काय घडलं?
पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या डॉ. हेमंत विष्णू सावरा यांचा विजय झाला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भारती कामडी यांचा पराभव केला. सावरा यांना 6 लाख 1 हजार 244 मतं मिळाली. तर कामडी यांना 4 लाख 17 हजार 938 मतं मिळाली. दोन्ही उमेदवारांमध्ये 1 लाख 83 हजार 306 मतांचा फरक होता. तर तिसऱ्या क्रमांकाच्या बहुजन विकास आघाडी या हितेंद्र ठाकूर यांच्या राजेश पाटील या उमेदवारानं 2 लाख 54 हजार 517 मते मिळवली.
पालघर लोकसभेत 63.91 टक्के मतदान
पालघर लोकसभा मतदार संघात 20 मे 2024 रोजी पार पडलेल्या निवडणुकीत एकूण मतदारांपैकी 63.91 टक्के मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघात एकूण 21,48,514 मतदार असून त्यापैकी 13,73,172 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पालघर लोकसभा मतदार संघात 10,23,080 महिला मतदार आहेत. त्यापैकी 06,40,628 महिलांनी मतदान केले. तसेच 11,25,209 पुरुष मतदार असून त्यापैकी 07,32,446 मतदारांनी मतदान केले आहे. त्याचप्रमाणे 225 तृतीयपंथी मतदार असून त्यापैकी 48 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
महायुतीकडून विधानसभेसाठी माजी खासदार राजेंद्र गावित रिंगणात-
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पालघर मतदारसंघासाठी राजेंद्र गावित यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे गटाचे विद्यामान आमदार श्रीनिवास वनगा यांना डावलून राजेंद्र गावित यांना तिकीट दिल्याने विविध चर्चा रंगल्या होत्या.