Suresh Dhas: 'फोन नाही उचलला तर मी राजकारण सोडेन', म्हणणाऱ्या भाजप उमेदवार सुरेश धस यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती; सहा वर्षात चार पटीने वाढ
Suresh Dhas: शपथपत्रात सादर करण्यात आलेल्या माहितीमध्ये सुरेश धस यांची संपत्ती सहा वर्षांमध्ये चार पटीने वाढली आहे.
बीड: बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून माजी आमदार सुरेश धस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दरम्यान दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात सादर करण्यात आलेल्या माहितीमध्ये सुरेश धस यांची संपत्ती सहा वर्षांमध्ये चार पटीने वाढली आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच निर्माण झाला होता. अखेर सोमवारी भाजपाने सुरेश धस यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर केली. धस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
धस यांच्या शपथ पत्रानुसार त्यांच्या दोन्ही पत्नींच्या व मुलींच्या नावे एकूण 36 कोटी 93 लाख 94 हजार 182 रुपये इतकी संपत्ती आहे. 2018 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील त्यांच्या शपथपत्रानुसार त्यांच्या पत्नीच्या आणि मुलांच्या नावे एकूण 9 कोटी 27 लाख 90 हजार 616 इतकी संपत्ती होती. ज्यात आता चार पटीने वाढ झाली आहे. सुरेश धस यांच्या स्वतःकडे एक कोटी 96 लाख 78 हजार 175 रुपयांची चल संपत्ती आहे. पत्नी संगीता यांच्या नावे 53 लाख 833 रुपये दुसऱ्या पत्नी प्राजक्ता यांच्या नावे आठ कोटी 89 लाख 97 हजार 649 रुपये इतकी संपत्ती आहे.
...त्या दिवशी राजकारण सोडेन- सुरेश धस
आष्टीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुरेश धस (Suresh Dhas) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत बोलताना सुरेश धस म्हणाले, गोपीनाथराव पहाटे देखील फोन घ्यायचे.गोपीनाथ मुंडे बोलतोय सांग काय काम आहे, असं म्हणायचे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना रिक्षावाल्याचा देखील फोन घ्यायचे. या नेत्यांसोबत काम केल्यामुळे मी माझ्या राजकीय जीवनात ठरवलं आहे. ज्या दिवशी माझा मोबाईल हॉलमध्ये ठेवून झोपायची वेळ माझ्यावर येईल किंवा फोन बंद करून झोपायची पाळी माझ्यावर येईल, त्या दिवशी मी राजकारण सोडेन. पण, कोणाचा फोन उचलणार नाही असं पाप माझ्यकडून होणार नाही. कधीपण ट्राय करा. रात्री १ वाजता फोन करा नाहीतर ३ वाजता फोन करा. उशाला फोन असतो, रात्री अडीच वाजता फोन आला. अपघात झाला, तर लगेच ड्रायव्हरला बोलवतो, कपडे घालतो. लगेच गाडीत बसून जातो, उगाच लोक घोषणा देत नाहीत, असं वक्तव्य धस यांनी सभेत केलं आहे.
आष्टीतून भाजपने विधानपरिषदचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. आष्टीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुरेश धस (Suresh Dhas) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत विरोधकांना टोले लगावले.