Andheri East Bypoll Election : अंधेरी पोटनिवडणुकीत 25 उमेदवार रिंगणात, मुख्य लढत ऋतुजा लटके-मुरजी पटेल यांच्यात
Andheri East Bypoll Election : अंधेरी पोटनिवडणुकीत प्रमुख लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल यांच्यात होणार असली तरी इथे 25 उमेदवार रिंगणात आहेत.
Andheri East Bypoll Election : मुंबईत (Mumbai) पुढील महिन्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीची देशभरात चर्चा आहे. ठाकरे-शिंदे गटाचं नाव आणि चिन्हाचा मुद्दा, त्यानंतर ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा कोर्टात पोहोचलेला वाद यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्याविरुद्ध शिंदे गटाचा नाही तर भाजपचा उमेदवार असणार आहे. या निवडणुकीत प्रमुख लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल (Murji Patel) यांच्यात होणार असली तरी इथे 25 उमेदवार रिंगणात आहेत.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटची तारीख 14 ऑक्टोबर होती. 166-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी 25 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडे दाखल केली आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या गटाने सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सावध पवित्रा घेत आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ऋतुजा लटके यांच्यासोबतच संदीप नाईक यांनीही उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. 25 पैकी आठ अपक्ष उमेदवार आहे. तर उर्वरित उमेदवार हे छोट्या संघटना, पक्षाचे आहेत.
हे उमेदवार रिंगणात!
मुरजी पटेल (भाजप), ऋतुजा लटके (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), निखिलकुमार ठक्कर (अपक्ष), चंद्रकांत मोटे (अपक्ष), संदेश जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया), मनोज नायक (राईट टू रिकॉल), अर्जुन मुरडकर (अपक्ष), आकाश नायक (भारत जनाधार पार्टी), मल्लिकार्जुन पुजारी (महाराष्ट्र विकास आघाडी), चंदन चतुर्वेदी (उत्तर भारतीय विकास सेना), राजेश त्रिपाठी (उत्तर भारतीय विकास सेना), संदीप नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), निकोलस अलोदा (अपक्ष), साकिब नफुर इमाम मलिक (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी), श्रीमती फर्झाना सिराज सय्यद (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी), अंकुशराव पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी/अपक्ष), बाळा विनायक (आपली अपनी पार्टी), वाहिद खान (अपक्ष) आणि निर्मल नागबतूला (अपक्ष), राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि श्रीमती नीना गणपत खेडेकर (अपक्ष).
शक्तिप्रदर्शन करत ऋतुजा लटके, मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल
अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत शुक्रवारी (14 ऑक्टोबर) अर्ज दाखल केले. मुरजी पटेल यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, नितेश राणे हे नेते सहभागी झाले. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आदी नेते उपस्थित होते.
ऋतुजा लटकेंच्या प्रचाराला आजपासून सुरुवात
दरम्यान उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात होत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांची प्रचार रॅली आज होणार आहे.