ABP Cvoter Exit Poll : सांगलीत नो मशाल, ओन्ली 'विशाल', तीन पाटलांच्या लढतीत अपक्ष विशाल पाटील बाजी मारण्याचा अंदाज
ABP Cvoter Exit Poll Results 2024 Maharashtra : सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील, महायुतीचे संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशा तीन पाटलांमध्ये लढत होती.
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेल्या सांगलीमध्ये अपक्ष आमदार विशाल पाटील (Vishal Patil Sangli) हेच बाजी मारणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि महायुतीचे संजयकाका पाटील यांना पराभव स्वीकारावा लागेल असं दिसतंय. तर राज्यामध्ये महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारत 23 ते 25 जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे महायुतीला 22 ते 26 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सांगलीच्या जागेवरून सुरूवातीपासूनच महाविकास आघाडीमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून तयारी सुरू केली असताना महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने परस्पर ही जागा चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू झाली.
सांगलीच्या काँग्रेस नेत्यांनी सुरुवातीपासूनच शिवसेनेला विरोध केला आणि ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी प्रयत्न केले. पण शेवटपर्यंत त्यांना यश आलं नाही आणि विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील, महायुतीचे संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशा तीन पाटलांमध्ये लढत होती. त्यामध्ये आता विशाल पाटील बाजी मारतील असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त केला जात आहे.
विशाल पाटलांच्या मागे काँग्रेसची ताकद
विशाल पाटील हे जरी अपक्ष उभे राहिले असले तरी त्यांच्यामागे जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांची छुपी ताकद असल्याचं दिसून आलं. खासकरून काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी विशाल पाटलांना मदत केल्याची उघड सत्य आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे त्या ठिकाणाहून विशाल पाटलांना मताधिक्य मिळाल्याची चर्चा आहे. येत्या 4 जून रोजी अंतिम निकाल समोर येणार आहे.
विधानसभा क्षेत्रनिहाय प्राथमिक अंदाजे मतदान
मिरज 62.10 टक्के
सांगली 58.20 टक्के
पलूस-कडेगाव 60.05 टक्के
खानापूर -आटपाडी 58.93 टक्के
तासगाव 66.06 टक्के
जत 60.73 टक्के
ही बातमी वाचा