एक्स्प्लोर
Advertisement
प्रियांका गांधींविषयी माहित नसलेल्या दहा गोष्टी
प्रियांका गांधी यांचा जन्म 12 जानेवारी 1972 रोजी दिल्लीत झाला. त्या राहुल गांधी यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत. प्रियंका गांधींविषयी फारशा माहित नसलेल्या दहा रंजक गोष्टी वाचा
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मोठा बदल केला आहे. प्रियांका गांधी यांनी राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज प्रियांका गांधींची काँग्रेस सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. तसंच प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पूर्वची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेश पश्चिमचं नेतृत्त्व ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
प्रियांका गांधींविषयी 10 रंजक गोष्टी
1. प्रियांका गांधी यांना यूपी-रायबरेलीचे लोक 'भईयाजी' म्हणूनही ओळखतात. केस लहान असल्यामुळे लहानपणी राहुलप्रमाणे त्यांनाही 'भईया' असंच संबोधलं जायचं. मोठेपणी भईया पुढे 'जी' लागलं.
2. 12 जानेवारी 1972 साली प्रियांका यांचा दिल्लीत जन्म झाला. त्या राहुल गांधी यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत. सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे त्यांना अनेकदा आपली शाळा बदलावी लागली. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी मानसशास्त्राची पदवी घेतली आहे.
3. प्रियांका गांधींमध्ये अनेकांना इंदिराजींची झलक दिसते. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण त्यांचं नाक अगदी आजीसारखंच टोकदार आहे. शिवाय आजीप्रमाणेच नेहमी त्या सुती साड्यांमध्ये वावरताना दिसतात. इंदिरा गांधींच्या अनेक साड्या आजही आपल्याकडे असल्याचं प्रियंकांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
4. वयाच्या सोळाव्या वर्षी प्रियांका गांधींनी आपलं पहिलं जाहीर भाषण दिलं. 2014 च्या निवडणुकीत जेव्हा 'राहुल कार्ड' अपयशी ठरत होतं, त्यावेळी प्रियांकांचा आवाज मात्र अमेठी, रायबरेलीत कणखरपणे पोहचत होता. लोकांच्या भावनांना हात घालण्याचं कसब त्यांच्या भाषणात आहे. लोकांना आपल्यासोबत हसवण्याचं, रडवण्याचं जे कसब मुरब्बी नेत्यांमधे असतं, त्याची झलक त्यांच्या भाषणात आहे. त्यांच्या भाषणात एक विशिष्ट स्टाईलही आहे.
5. प्रियांका गांधी बुद्धिझमच्या उपासक आहेत. आई सोनिया यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपलं वैयक्तिक जीवन अत्यंत काळजीपूर्वक पब्लिक लाईफपासून दूर ठेवलं आहे. पण बुद्धिझमवरचं त्याचं हे प्रेम मात्र लपू शकलेलं नाही. गेल्या अकरा वर्षांपासून त्या नियमितपणे विपश्यना करतात, असंही काही जवळचे लोक सांगतात. राजकारणाच्या धकाधकीतही त्यांचं एकदम फ्रेश स्माईल हे कदाचित याच नियमित ध्यानधारणेमुळे टिकलं असावं.
6. उत्तम संघटक म्हणून त्या राजकारणात किती प्रभावी ठरतात हे अजून उलगडायचं आहे, पण कौटुंबिक आयुष्यात मात्र त्यांनी हा रोल यशस्वी करुन दाखवला आहे. एक उत्तम आई, आदर्श बहीण, मुलगी म्हणून त्या आपली भूमिका बजावतात. आपल्या मुलांना शाळेसाठी तयार करणं, त्यांचा डबा भरणं, त्यांना शाळेत सोडणं ही कामं त्यांच्या रोजच्या वेळापत्रकाचाच भाग राहिली आहेत. प्रियांका गांधींच्या हातचा कपकेक ही त्यांच्या मुलांची सर्वात आवडती गोष्ट आहे. त्यामुळे त्याची फर्माइश घरात सतत होत असते.
7. प्रियांका गांधी यांनी त्यांचे बालपणीचे मित्र रॉबर्ट वढेरा यांच्याशी प्रेमविवाह केला. 18 फेब्रुवारी 1997 ला या दोघांचा विवाह दिल्लीत पार पडला. प्रियांका आणि रॉबर्ट वढेरा एकमेकांना वयाच्या 13 व्या वर्षापासून ओळखतात. रॉबर्ट हे उद्योगपती आहेत. प्रियांका गांधींचा स्वतःच्या प्रेमावर इतका विश्वास होता की सोनिया गांधींनीही या लग्नाला म्हणूनच परवानगी दिली.
8. प्रियांका आणि रॉबर्ट या जोडप्याला रेहान आणि मिराया ही दोन मुलं आहेत. रेहान मिरायापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. प्रियांका गांधी यांची मुलगी सध्या डेहराडूनच्या प्रसिद्ध वेलहम गर्ल्स बोर्डिंग स्कूलमध्ये शिकते.
9. 2014 च्या निवडणुकीवेळी मोदींनी प्रियांका गांधी यांच्यावर आपण टीका करत नाही, हे दाखवताना 'ती मला मुलीसारखी आहे' असं म्हटलं होतं. पण त्यावर प्रियांका गांधी यांनी अगदी ताठपणे 'मैं राजीव गांधी की बेटी हूं' असं उत्तर दिलं होतं. शिवाय अमेठीतून राहुल विरोधात लढणाऱ्या स्मृती इराणी यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर स्मृती इराणी? कोण आहेत त्या? असं उत्तर दिलं होतं.
10. प्रियांका गांधींच्या व्यक्तिमत्त्वात एक स्वतंत्र फॅशन स्टेटमेंट आहे. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने एकदा प्रियांका गांधी या माझ्या ideal of beauty आहेत असं म्हटलं होतं. एरवी त्या सतत कडक सुतीच्या साड्यांमध्ये वावरतात. पण एकदा संसदेच्या आवारात त्यांनी ब्लॅक जीन्स, व्हाईट शर्टमध्ये येऊन सर्वांना चकितही केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement