एक्स्प्लोर
Advertisement
जनतेचा कौल युतीला, त्यांनी सरकार स्थापन करावं : शरद पवार
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्यातल्या सत्ता संघर्ष, अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, अयोध्याचा नियोजित निकाल आणि दिल्लीतील पोलिस-वकिलांचं आंदोलन यावर भाष्य केलं.
मुंबई : "राज्यातील परिस्थितवर बोलण्यासारखं काही. आम्हाला मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची सुसंधी महाराष्ट्राच्या जनतेने दिली आहे. जनतेने भाजप-शिवसेनेला कौल दिला आहे, त्यांनी तातडीने सरकार स्थापन करावं," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्यातल्या सत्ता संघर्ष, अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, अयोध्याचा नियोजित निकाल आणि दिल्लीतील पोलिस-वकिलांचं आंदोलन यावर भाष्य केलं.
विरोधी पक्षात बसणार ही तुमची आताची भूमिका भविष्यात बदलू शकते का या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, "आम्हाला जनतेचा कौलच विरोधी पक्षात बसण्यासाठीचा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आकडे बहुमतापर्यंत जुळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे."
राज्यसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राऊतांशी चर्चा : शरद पवार
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सिल्वर ओक इथे शरद पवारांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये केवळ दहा मिनिटांची भेट झाली. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादीची भूमिका काय आहे हे स्पष्ट होईल अशी अपेक्षा होती. परंतु संजय राऊत कोणताही प्रस्ताव घेऊन आले नव्हते. ते नेहमीसारखे भेटायला आले होते. राज्यसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्याशी चर्चा झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित निर्णय घेतील ही अपेक्षा : शरद पवार
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देईल, अशी चर्चा रंगली होती. परंतु शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अनुकूल नसल्याचं समजतं. काँग्रेस द्विधा मनस्थितीत आहे. काँग्रेसमधील एक गट शिवसेनेला पाठिंबा देऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवावं या मताचा आहे. मात्र दोन्ही पक्षाची विचारधारा वेगळी आहे, त्यामुळे पाठिंबा देऊ नये, असं मत दुसऱ्या गटाचं आहे. परिणामी काँग्रेसचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याबद्दल शरद पवार म्हणाले की, "काँग्रेसचा निर्णय काय हे अद्याप आमच्या कानावर आलेला नाही. आम्ही एकत्रित निवडणूक लढलो, त्यामुळे निर्णय एकत्रित घ्यावा, अशी आमची भावना आहे."
अहमद पटेल-नितीन गडकरी भेटीविषयी काय म्हणाले?
दिल्लीत आज काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीविषयी विचारलं असता शरद पवार यांनी स्मितहास्य करत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "गडकरींकडे कुणी गेलं असेल तर ते जरुर रस्त्यांच्या कामासाठी गेलं असणार. अहमद पटेल जबाबदार व्यक्ती असून ते दुसऱ्या कुठल्या कारणासाठी भेटले असतील असं वाटत नाही."
दरम्यान, बहुमत नसतानाही अमित शाहांनी मागच्या काळात सरकारं स्थापन केली आहेत, मग महाराष्ट्रात ते लक्ष घालत नाहीत असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, "त्यांच्या या सत्तास्थापनेच्या कौशल्याची तुमच्याप्रमाणे आम्हीही आतुरतेने वाट पाहतोय. त्यांनी सरकार बनवावं."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement