(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नीटच्या परीक्षेतील गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी
NEET Exam Controversy : नीट परीक्षेत झालेला गोंधळ आणि पेपर लीक संदर्भात होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
नागपूर : नीट परीक्षेत (NEET Exam) झालेल्या गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. नीट परीक्षेत झालेला गोंधळ आणि पेपर लीक संदर्भात होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
नीटच्या परीक्षेतील गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करा
नागपूरच्या व्हेरायटी चौकावर झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी एनटीएच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नीटची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. त्यात असा गोंधळ होणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळचं म्हणावं लागेल.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन
एकाच परीक्षा सेंटरवरील अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणे संशयास्पद असून हा इतर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे. सरकारनं यंदाच्या परीक्षेत झालेले गोंधळ आणि गैरव्यवहारांची सीबीआयकडून तपासणी करावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
NEET परीक्षेच्या गुणांवर आक्षेप
नीट परीक्षेच्या निकालामध्ये 67 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. निगेटिव्ह मार्किंग प्रणाली असताना 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याशिवाय, 100 टक्के गुण मिळालेल्या 67 पैकी बहुतांश विद्यार्थी एकाच परीक्षा केंद्रावरील असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नीट परीक्षेतील गैरकारभाराविरोधात न्यायालयात जाणार
नीट प्रवेश परीक्षेतील गैरकारभाराविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय शिक्षणाच्या ‘नीट’ या प्रवेशपरीक्षेमध्ये उत्तर भारतातील एका केंद्रातील विद्यार्थ्यांना वाढीव गुण देत उत्तीर्ण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून राज्यातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणं कठीण होणार आहे. त्यामुळे ही प्रवेश परीक्षा रद्द करण्याची विनंती करणार असल्याचे व पर्यायी आवश्यकता भासल्यास न्यायालयातही याचिका दाखल करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मोदी सरकार विद्यार्थ्यांसाठीही शाप, NEET पेपर फुटीमुळे 23 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा; वर्षा गायकवाडांचा आरोप
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI