पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी जेईई मेन 2021 परीक्षेबाबत चिंता करू नये, आणखी एक संधी दिली जाणार
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी जेईई मेन 2021 परीक्षेबाबत चिंता करू नये, विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्र पूरग्रस्त भागात परीक्षा केंद्रावर पोहचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई मेन 2021 सेशन 3 परिक्षेसाठी एक संधी दिली जाणार आहे. त्यामुळे परिक्षेला पोहचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. ज्या प्रकारे मागील तीन ते चार दिवसापासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.
शिवाय, अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. ही सगळी परिस्थिती विचारात घेताना, या भागात असलेल्या केंद्रावर जेईई मेन 2019 सेशन 3 परीक्षेसाठी विद्यार्थी पोहोचण्यास अडचणी निर्माण होणार असून याबाबत विद्यार्थी पालकांकडून चिंता व्यक्त केली जात होती. त्याला प्रतिसाद देत, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला सूचना देत जे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर या अडचणीमुळे पोहचू शकणार नाहीत. त्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.
जेईई मेन 2021 सेशन 3 परीक्षा 25 आणि 27 जुलै दरम्यान आहे. मात्र, कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे जे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचू शकणार नाहीत किंवा पोहोचण्यास अडचणी येतील त्यांनी चिंता व्यक्त न करता त्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी परीक्षेसाठी दिली जाईल आणि त्यांच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
देशातील कोरोना परिस्थिती पाहता या वर्षी जेईई मेन 2021 परीक्षा ही 4 सेशन मध्ये घेण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च सेशनची परीक्षा झाली असून दुसऱ्या लाटेत पुढे ढकलण्यात आलेली सेशन 3 ची परीक्षा 20 ,22, 25 आणि 27 जुलै या तारखेदरम्यान नियोजित जात आहे. मात्र, याच दरम्यान राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे लवकरच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जे विद्यार्थी 25 ते 27 जुलै दरम्यान परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी एक संधी उपलब्ध करून देऊन त्याबाबतच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI