Crime News : भर रस्त्यात प्रहार पक्षाच्या नगरसेवकाची निर्घृण हत्या; यवतमाळमधील धक्कादायक घटना
Yavatmal Crime News : रेती व्यवसायीक तथा प्रहार पक्षाच्या नगरसेवकाची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आलीय. यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील मिटणापूर येथे ही घटना घडली आहे.
Yavatmal Crime News : यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील मिटणापूर येथे रेती व्यवसायीक तथा प्रहार पक्षाच्या नगरसेवकाची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आलीय. अनिकेत गावंडे असे हत्या झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. रेती व्यवसायातील भागीदार असलेल्या मित्रानेच चाकूने वार करून गावंडे यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सड्डू उर्फ सादीकमुल्ला सलीम मुल्ला ( वय, 27), गोलू उर्फ समीरमुल्ला सलीममुल्ला ( वय, 25) आणि सोनू उर्फ आबीदमुल्ला सलीममुल्ला ( वय 22, सर्व रा. मिटनापूर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान यवतमाळच्या बाबूळगाव तालुक्यातील मिटणापूर येथे मृत अनिकेत गावंडे याचा भाऊ शुभम गावंडे हा व्यवसायातील पैसे मागण्यांसाठी संशयीत आरोपींकडे गेला होता. यावेळी तेथे जोरदार वादावादी झाली. वाद झाल्यामुळे शुभम गावंडे याने भाऊ अनिकते गावंडे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. अनिकेत गावंडे तेथे आल्यानंतर त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. यातूनच संशयीतांनी अनिकेत गावंडे यांच्यावर धारदार चाकूने छातीवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अनिकेत रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच बाभूळगावच्या व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत.
Yavatmal Crime News : व्यवसायातील भागीदारीतून झाली हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेतची हत्या ही रेती व्यवसायातील भागीदारीतून झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत अनिकेत गावंडे हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असून त्याने पैसे कमवण्यासाठी रेती व्यवसायात शिरकाव केला होता. रेतीच्या या व्यवसायात प्रचंड स्पर्धा वाढली असून यात बहुतांश गुन्हेगारी प्रवृत्तीचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत चालली आहे. अनिकेतने रेती व्यवसायातून पैसे कमवल्यानंतर त्याने राजकारणात प्रवेश केला. बाभूळगावात नगरपंचायत निवडणूक लढली. त्यात तो विजयी झाला. त्यामुळे त्याचे राजकीय प्रतिस्पर्धीही वाढले होते.
यवतमाळ जिल्हा गुन्हेगारी क्षेत्रात अव्वल ठरला जात आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत यवतमाळ जिल्हा गुन्हेगारीत सर्वात वरच्या लिस्टवर आहे. गेल्या 70 दिवसात म्हणजेच 1 जानेवारीपासून आजपर्यंत जिल्ह्यात 25 हत्या झाल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या