प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीवर जीवघेणा हल्ला
नागपूरमध्ये आपल्या पतीला मारण्यासाठी पत्नीने प्रियकराची मदत घेत पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नागपूर : दोन डिसेंबरच्या रात्री नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत डेकाटे दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीने पतीचा काटा काढण्यासाठी आपल्या प्रियकराच्या मदतीने हा हल्ला घडवल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे पत्नीला अशी युक्ती टीव्हीवरील क्राईम मालिका पाहिल्यानंतर सुचली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन डिसेंबरच्या रात्री राकेश आणि राजश्री डेकाटे हे दोघे राजश्री यांच्या माहेरातून नागपूरला परतत असताना गोरेवाडा परिसरात राजश्री यांनी उलटी आल्याचे कारण सांगून राकेश यांना दुचाकी थांबवायला लावली. त्याच वेळी एका चेहरा झाकलेल्या हल्लेखोराने राजश्री आणि राकेश यांच्यावर हल्ला केला. राजश्रीला किरकोळ मारहाण केल्यांनतर हल्लेखोराने हातातल्या तीक्ष्ण हत्याराने राकेश यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला आणि राकेश यांना गंभीर जखमी अवस्थेत सोडून पळून गेला. राजश्री यांनी घटनेच्या अनेक तासानंतर गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये पतीवरील हल्ल्याची तक्रार दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी ही जोरात तपास सुरु केला. मात्र, हल्लेखोराने डेकाटे दांपत्त्यांकडून कोणतीही लूट केली नव्हती. त्यामुळे हल्ल्याचा उद्दिष्ट नेमकं काय हे पोलिसांना स्पष्ट होत नव्हते. पोलिसांना जखमी राकेश यांच्या पत्नीच्या वर्तणुकीवर शंका आल्यामुळे तिचा मोबाईल फोन ताब्यात घेतला आणि त्याच्यातील गेल्या अनेक महिन्यांचा डिलीटेड डाटा पुन्हा मिळवला. त्यात राजेश यांच्या पत्नी राजश्रीचे एका रजत सोमकुंवर नावाच्या इसमासोबत प्रेम संबंध असल्याचे समोर आले. पोलिसांनी रजत सोमकुंवर याला ताब्यात घेतले असता त्यानेच राजश्रीच्या सांगण्यावरून राकेश डेकाटेला संपवण्यासाठी हल्ला केल्याचे कबूल केले.
रजत आणि राजश्री यांचे गेले सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र, राजश्रीचे लग्न राकेश सोबत झाले. नेहमीच क्राईम पेट्रोल सारख्या गुन्हे विषयक मालिका पाहणाऱ्या राजश्री यांना आपल्या प्रेमीला पुन्हा प्राप्त करण्यासाठी युक्ती सुचली आणि तिने रजतला राकेशचा खून करण्यास तयार केले. कोणाला शंका येऊ नये त्यासाठी राजश्री पती राकेशला घेऊन माहेरी गेली. रात्री उशीरा नागपुरात परतत असताना नागपूरच्या वेशीवर उलटी आल्याचे सोंग करत निर्जन ठिकाणी अंधारात दुचाकी थांबवायला लावली. तिथेच दबा धरून बसलेल्या रजतने राकेशवर हल्ला केला. राकेशचे नशीब बलत्तवर असल्याने गंभीर जखमी होऊन ही त्याचा जीव वाचला. पोलिसांनी रजत सोमकुंवर आणि राजश्री डेकाटे या दोघांना हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात अटक केली आहे.