![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Wardha : घरातून काढला सोन्याने भरलेला हंडा, पण पुढं जे घडलं ते धक्कादायक
Wardha News Update : वर्ध्या जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील वाढोना गावात एका महिलेची घरातील सोनं शोधून देण्याच्या आमिषाने फसवणूक करण्यात आली आहे.
![Wardha : घरातून काढला सोन्याने भरलेला हंडा, पण पुढं जे घडलं ते धक्कादायक Wardha News Update A woman was cheated in Wardha with the lure of removing gold from the house Wardha : घरातून काढला सोन्याने भरलेला हंडा, पण पुढं जे घडलं ते धक्कादायक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/18/81f19b6704a8c701aa9c8da162236f131679163008024328_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Wardha News Update : वर्ध्या जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील वाढोना गावात एका महिलेची घरातील सोनं शोधून देण्याच्या आमिषाने फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. घरात सोन्याचा हंडा आहे आणि आम्ही तो शोधून देतो असे आमिष दाखवून 50 हजार रूपयांची या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे.
"तुमच्या घरात सोन्याचा हांडा आहे, तो काढण्यासाठी पैसे लागतील. सोन्याचा हिरा देखील आहे, असे आमिष दाखवून महिलेकडून 50 हजार रुपये उकळले. महिलेने पैसे दिल्यानंतर तिच्या घरातून हंडा देखील काढून दिला. परंतु, सापडलेल्या हंड्यात पॉलिश केलेले दगड निघाल्याचे समोर आले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने परिसरातील नागरिकांच्या मदतीने दोन्ही भामट्यांना पकडून ठेवत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. आसाराम नंदू वाघ आणि रोशन पिसाराम गुजर ( रा. परसोळी ता. कळमेश्वर जि. नागपूर ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील आणखी दोन आरोपी फरार असल्याची माहिती आर्वी पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढोणा येथील इंदिरा गुलाब राऊत या महिलेच्या घरी 9 मार्च रोजी हातात मोरपीस असलेला झाडू घेऊन दोन व्यक्ती आले. त्यातील एकाने दहा रुपये मागितले. इंदिरा यांनी दहा रुपये दिले असता एकाने डोक्यावर झाडू मारुन तुमच्या घरात सोन्याचा हांडा आहे, तो काढण्यासाठी सहा हजार रुपये लागतील असे सांगितले. इंदिरा यांनी सहा हजार रुपये उसने घेऊन त्या व्यक्तीला दिले. दोघांनीही पैसे घेतले आणि तेथून निघून गेले. 11 मार्च रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास दोघेही पुन्हा महिलेच्या घरी आले आणि घरातील पोर्च जवळ खड्डा करुन जमिनीतून हंडा काढला.
दोघांनी पुन्हा महिलेकडून 13 हजार रुपये घेतले. त्यानंतर दोघांनी तुमच्या घरात यापेक्षाही मोठा ऐवज आहे, एक मोठा हिरा आहे तो नंतर काढून देतो, असे म्हणत पैसे घेऊन निघून गेले. दुसऱ्या दिवशी फोन करुन माझ्या मित्राला 21 हजार रुपये देऊन त्याच्याकडून औषध घेऊन या असे भामट्याने सांगितले. महिलेच्या मुलाने सकाळच्या सुमारास आर्वी बसस्थानकावर जाऊन एका व्यक्तीला 21 हजार रुपये देत औषध घरी आणले. दोन्ही आरोपी पुन्हा घरी आले. इंदिरा राऊत यांच्या मुलाने औषध त्यांना दिले. त्यांनी पुन्हा जमिनीतून हांडा काढून त्या खड्ड्यात औषध टाकले आणि या खड्ड्यात मोठा हिरा आहे असे म्हणत तो खड्डा बुजवून पुन्हा दहा हजार रुपये घेऊन निघून गेले. पुन्हा 12 मार्च रोजी महिलेच्या मुलाने सोनं शोधणाऱ्या भामट्याला फोन केला. तेव्हा त्याने हिरा काढण्यासाठी 9 लाख 10 हजार रुपये द्यावे लागेल असे सांगितले. त्यावेळी राऊत यांना संशय आल्याने त्यांनी जमिनीतून काढलेला हांडा उघडून पाहिला असता त्यात सोन्याचे पॉलिश केलेले दगडं आणि मूर्ती होती. हे पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)