(Source: Matrize)
Wardha : समुद्रपूर वाघ शिकार प्रकरणात चार दात आणि 17 नखं जप्त, आरोपी अटकेत
Forest Department : शेत परिसरात तारेच्या कुंपनामध्ये विद्युत प्रवाह प्रवाहित करून वाघाची शिकार करण्यात आली होती.
वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील मौजा पवनगाव येथील वाघाच्या शिकार प्रकरणी वन विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यामधील महालगाव (खुर्द) येथून अविनाश भारत सोयाम (वय 34 वर्ष ) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी सोयाम हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून यानेच त्याच्या शेतातील झोपडीमध्ये वाघाचे चार दात आणि तब्बल 17 नखे पुरुन ठेवली होती. वाघाचे हे अवयव वनविभागाने गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी धडक कारवाई करून जप्त केले आहेत.
कुंपणाला विद्युत प्रवाह, वाघोबाची शिकार
चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या वरोरा तालुक्यातील महागाव (खुर्द) शेत परिसरात तारेच्या कुंपनामध्ये विद्युत प्रवाह प्रवाहित करून वाघाची शिकार करण्यात आली होती. आरोपीने शिकारीनंतर वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच भागातील एका पडीक शेतजमिनीवर वाघाचा मृतदेह नेला. पण प्रयत्न सफल झाला नाही, यश काही आलं नाही. त्यामुळे आरोपीने थेट चंद्रपूर जिल्ह्याची सीमा ओलांडली आणि वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मौजा पवनगाव येथील झुडपी जंगल गाठले. याच ठिकाणी आरोपीने वाघाच्या मृतदेहाचे तुकडे फेकून देत यशस्वी पळ काढला. शिवाय काहीच झाले नाही असे दर्शवत होता.
पण नंतर वाघाच्या शरीराचे 14 तुकडे कुजलेल्या अवस्थेत सापडून आले होते. त्यानंतर वनविभागही ॲक्शन मोडवर आला. तब्बल 14 तुकड्यांत वाघाचा मृतदेह सापडला. पण वाघ नखे आणि दात सापडले नाही. हे लक्षात येताच नक्कीच हा प्रकार शिकारीचा असल्याचा अंदाज आला. यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत वनविभागाने मुख्य आरोपी अविनाश भारत यास अटक करून वनकोठडी मिळविली. वनकोठडीत असलेला आरोपी अविनाश तपास अधिकाऱ्यांना हवं तसे सहकार्य करीत नसला तरी वनविभागाने पुन्हा तपासाला गती दिली.
अखेर वाघाची चार दात आणि तब्बल 17 नखं जप्त
त्यानंतर बुधवारी उपवनसंरक्षक राकेश शेपट यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार यांच्या नेतृत्त्वात समुद्रपूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर, वनपाल विजय धात्रक, वनरक्षक योगेश पाटील, एम. डी. किटे, रमेश चोखे, विजय दिघोळे, सुरेखा तिजारे, शरद ओरके, अविनाश बावणे, अनिल जुमडे, रितेश भानुसे यांनी चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील महालगाव खुर्द गाठलं आणि वाघाची 4 दात आणि तब्बल 17 नखं जप्त केली.
आरोपी अविनाश भारत सोयाम याने त्याच्याच महालगाव शिवारातील शेतातील झोपडीत वाघाची चार दात आणि तब्बल 17 नखे कुणालाही सहज मिळू नये या हेतूने पुरविली होती. ती वनविभागाने जप्त केली असली तरी अविनाश हा वाघाच्या या अवयवांची कुणाला विक्री करणार होता याचा शोध सध्या वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.