(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha: आर्वी पालिका कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला 'गोल्ड'चा नाद, मोपेड वाहनाला बांधून विहिरीत फेकले
Wardha Arwi Murder: आर्वी महापालिकेतील हा कर्मचारी काहीच महिन्यामध्ये निवृत्त होणार होता. आता त्याची हत्या झाली आहे.
वर्धा: आर्वी नगरपालिकेतील स्वच्छता विभागातील एका कर्मचाऱ्याला सोन्याचे आभूषण परिधान करणे चक्क जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या चौकशीत पुढे आला आहे. याप्रकरणी आर्वी पोलिसांनी चार व्यक्तींना ताब्यात घेत त्यांच्यावर मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी मृतक पालिका कर्मचाऱ्याच्या अंगावरील सोनसाखळ्या, सोन्याच्या अंगठ्या, तसेच सोन्याचे अन्य आभूषण बळजबरीने ताब्यात घेऊन त्याला मारहाण करीत निर्दयतेचा कळस गाठून चक्क मोपेड वाहनाला बांधून विहिरीत फेकून दिले. यामुळे पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. महिंद्र रामरावजी शिंगाणे असे मृत पालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे.
महिंद्र रामरावजी शिंगाणे हा 25 मे पासून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. पण तो कुठेही न सापडल्याने अखेर महिंद्राच्या कुटुंबीयांनी आर्वी पोलीस स्टेशन गाठले. तेथे महिंद्राच्या कुटुंबीयांनी महिंद्रा हा घरून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. एक जूनला पोलिसांना महिंद्र ची हत्या झाल्याचा संशय आल्याने पोलिसांनी आपल्या तपासाला गती दिली. पोलिसांनी 1 जूनला सुरुवातीला काही व्यक्तींना ताब्यात घेत अधिकची विचारपूस केली.
त्यानंतर महिंद्रची हत्या झाल्याचे पुढे आले. पण रात्री आठ वाजले तरी पोलिसांना महिंद्राचा मृतदेह गवसला नव्हता. अखेर संशयितांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी एका विहिरीची बारकाईने पाहणी केली. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास महिंद्रचा मृतदेह विहिरीत आढळला. पोलिसांनीही परिसरातील नागरिकांच्या मदतीने महिंद्रचा मृतदेह बाहेर काढून त्याचा पंचनामा करीत मृतदेह तपासणीसाठी आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी आर्वी पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरणासह मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
महिंद्रची होती अवैध सावकारी
आर्वी शहरातील गोल्डमॅन अशी ओळख असलेल्या आर्वी नगरपालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचारी महिंद्रा हा छोट्या प्रमाणात छुप्या पद्धतीने अवैध सावकारीचा व्यवसायही करत होता. तो अनेक गरजूंना 5 ते 10 हजार रुपये पर्यंतची रोकड व्याजाने द्यायचा असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.
सेवानिवृत्तीला शिल्लक होते अवघे काही महिने
पालिका कर्मचारी महिंद्रा याची निर्दयतेने हत्या करण्यात आली. मृतक हा 58 वर्षे वयोगटातील असून येत्या काही महिन्यात तो शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणार होता. पण निर्दयतेचा कळस गाठणाऱ्या आरोपींनी त्याला त्याच्याच मोपेड वाहनाला बांधून थेट विहिरीत फेकून त्याची हत्या केली. या घटनेमुळे आर्वी शहरासह संपूर्ण वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
शवविच्छेदन अहवालानंतर मिळणार अधिकची माहिती
आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी महिंद्र चा मृतदेह आणण्यात आला. या ठिकाणी अडीच तासांच्या कालावधीत वैद्यकीय तज्ज्ञांकडून शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय तज्ञांकडून मिळणार्या शवविच्छेदन अहवालातून पोलिसांना अधिकची माहिती मिळणार आहे. त्यामुळे पोलिसांचेही शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष लागले आहे.