10 लाखांच्या खंडणीसाठी अल्पवयीन भावंडांचं अपहरण, मुंबई पोलिसांनी सात तासात आरोपींना ठोकल्या बेड्या
Crime News Update : वसईतील नायगाव पोलिसांनी अवघ्या सात तासात अपहरण झालेल्या अल्पवयीन बहिण भावाची सुटका केली. दोन आरोपींना बेड्याही ठोकल्या.
Crime News Update : वसईतील नायगाव पोलिसांनी अवघ्या सात तासात अपहरण झालेल्या अल्पवयीन बहिण भावाची सुटका केली. पोलिसांनी धडक कारवाई करत अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पेल्हारचं अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि हत्येचं प्रकरण ताजं असतानाच नायगांव पोलिसांनी वेगवान ॲक्शन घेवून, बहिण भावांची सुटका केली आहे. वसईत नायगाव पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होतेय.
नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या एका 17 वर्षीय मुलीचे आणि तिच्या 7 वर्षांच्या लहान भावाचे 10 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. नायगाव पोलीस ठाण्यात मुलांच्या वडिलांनी तात्काळ तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन, तात्काळ तीन पथके तयार केली. पोलिसांनी सुत्रे हलवत अवघ्या सात तासात दोन आरोपींना अटक करुन, मुलांची सुखरूप सुटका ही केली.
10 लाखांच्या खंडणीची मागणी -
अपहरण झालेल्या मुलांच्या वडिलांचे नायगावमध्ये दुकान आहे. त्याच्याकडे काही रोकड रक्कम ही आली होती. शनिवारी त्यांची 17 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाले होते. त्यांचा सर्वत्र शोध सुरू असताना अचानक मुलीच्या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. तेरी लडकी और लडके को किडनॅप किया हूँ, बच्चोके पेटपे बंब बांधके रखा हूँ, रिमोट मेरे हात में है, एक मिनीट में जान से मार डालूंगा, अगर उनकी सलामती चाहते हो, तो तुम 10 लाख जहॉं अँड्रेस बताउंगा वहा लेके जाना, तुम्हारे बच्चे दोनो बच जाएंगे.. असं बोलून अपह्त मुलांचा आवाज ही अपहरणकर्त्यांनी ऐकवला. मुलांच्या वडिलांनी तात्काळ नायगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली.
गुन्हा दाखल -
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून खंडणी, अपहरण आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला आणि तपासासाठी तीन पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण आणि तपास करून पोलिसांनी आरोपींना पैसे देण्याच कबूल करण्याचा वडिलांना सांगितलं. पैसे घेण्यासाठी बोलावलं आणि दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. काशिमिरा येथून मुलगा आणि मुलीची सुखरूप सुटका ही केली.
दोन जणांना अटक -
या प्रकरणी जयप्रकाश उर्फ सोनू गुप्ता (23) आणि विपुल तिवारी (20) या दोघांना अटक केली आहे. हे पहिले शाळेत स्कूल ड्रायव्हर आणि क्लिनर होते. सध्या काहीही कामधंदा त्यांच्याकडे नव्हता. माञ यातील एक आरोपी अपहरणकर्ता मुलीचा मित्र होता. त्यामुळे या मुलीचा, या अपहरण नाट्यात सहभाग आहे का..? किंवा वडिलांच्या कुणी परिचयाचा होता का...? याबाबत पोलीस आता तपास करत आहेत. आरोपींना पकडताना झालेल्या झटापटीत पोलीस शिपाई अशोक पाटील यांच्या हाताला दुखापत झाली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.