Crime News: पुष्पा स्टाईलने गांजाची तस्करी, 20 लाखांच्या मुद्देमालासह दोन आरोपी उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या जाळ्यात
Ulhasnagar Crime : संशयास्पद गाडीतून पोलिसांनी 61 किलोंचा गांजा पकडला आणि या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

ठाणे: उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने नेरळ-बदलापूर रस्त्यावर पुष्पा या चित्रपटाच्या स्टाईलप्रमाणे गांजाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. या आरोपीनी इनोव्हा गाडीत वेगवेगळ्या ठिकाणी गांजा लपवून ठेवला होता. या कारवाईमध्ये तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरळ-बदलापूर रस्त्यावरून टोयोटा इनोव्हा या गाडीमध्ये काही जण लाखोंचा गांजा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती क्राईम ब्रांचचे शेखर भावेकर आणि राजेंद्र थोरवे यांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस पथकाने सदर परिसरात सापळा रचला.
दरम्यान यावेळी एक इनोव्हा गाडी क्रमांक MH 06/ BF 2628 ही गाडी संशयास्पद पद्धतीने फिरताना पोलिसांना आढळली. त्यांनी तात्काळ गाडी अडवून गाडीची तपासणी केली असता त्या गाडीच्या विविध पार्टसमधून तब्बल 61 किलो गांजा मिळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामचंद्र शामराव शिंदे आणि विलास सीताराम वाघे या दोघांना अटक केली आहे.
पुष्पा या चित्रपटात ज्या पद्धतीने चंदनाच्या लाकडांची तस्करी करण्यात येत होती, त्याच पद्धतीने हे आरोपी देखील गांजाची तस्करी करत असल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज केलेल्या या कारवाईनंतर उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुथूट फायनान्सच्या भिंतीला खड्डा करुन चोरीचा प्रयत्न फसला
उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंच्युरी रेयॉन कंपनीसमोर असलेल्या मुथूट फायनान्स या बँकेला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुथूट फायनान्सजवळील लॉन्ड्रीच्या दुकानाच्या भिंतीला होल मारुन तिथून बँकेत शिरण्याचा चोरट्यांचा प्लॅन होता. परंतु मात्र बँकेच्या भिंतीला होल मारण्यात त्यांना जास्त वेळ लागल्याने सकाळ झाली. त्यामुळे त्यांनी चोरी करण्यापूर्वीच तिथून पळ काढला. या घटनेतील काही संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-3, संच्युरी कंपनी परिसरातील मुख्य रस्त्याशेजारी मुथूट फायनान्स बँक आहे. सोन्याच्या दागिन्यांवर याठिकाणी कर्ज मिळते. बँक शेजारीच लॉन्ड्रीचे दुकान आहे. मुथूट फायनान्स या बँकेच्या बाजूला असलेल्या पावर लॉन्ड्रीच्या दुकानातील भिंतीला खड्डा करुन बँक लुटण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. मात्र हा प्रयत्न फसला आहे. लॉन्ड्रीच्या दुकानात तर चोरट्यांनी भगदाड पाडलं, पण मुथूट फायनान्स बँकेच्या भिंतीला भगदाड पाडण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला. खड्डा तयार करता करता सकाळ झाली. त्यामुळे चोरी न करताच चोरट्यांनी तिथून पळ काढला.
ही बातमी वाचा:























