वाढदिवसाला मित्रांना पार्टी दिली, दारुवरुन झाला वाद, बर्थडेलाच दोस्तांनी घेतला जीव
Crime News : वाढदिवसाच्या पार्टीत दारूवरून वाद झाल्याने तीन मित्रांनी बर्थडे बॉयलाच चौथ्या मजल्यावरुन ढकलून देत त्याचा खून केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली होती.

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मित्रांमध्ये झालेल्या वादातून एकाचा जागीच मृत्यू झाला होता. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मित्रांमध्ये दारुवरुन वाद झाला, आधी बाचाबाची झाली, त्यानंतर हा वाद धक्काबुक्की झाली. वाढदिवसाच्या पार्टीतच दारुवरून वाद झाल्यानं बर्थडे बॉयला चौथ्या मजल्यावरुन ढकललं, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा जीव गेल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उल्हासनगरच्या चिंचपाडा भागातील ही दुर्देवी घटना घडली होती. पोलिसांनी या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी याप्रकरणी तीन मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे.
वाढदिवसाच्या पार्टीत दारूवरून वाद झाल्याने तीन मित्रांनी बर्थडे बॉयलाच चौथ्या मजल्यावरुन ढकलून देत त्याचा खून केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या तीन मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास कऱण्यात येत आहे. कार्तिक वायाळ असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. 27 जून रोजी कार्तिक वायाळ याचा वाढदिवस होता, त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणामुळे चिंचवाडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्या दिवशी नेमकं काय झालं होतं ?
चिंचपाडा परिसरात राहणारा कार्तिक वायाळ याचा 27 जून रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याने त्याचे मित्र निलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांना पार्टी दिली. चिंचपाडा गावातील आर्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील निलेश क्षीरसागर याच्या फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरू होती. मात्र या पार्टीत दारूवरून मित्रांमध्ये वाद झाला. पहिल्यांदा यांच्यामध्ये बाचाबाची झाली, पण त्यानंतर या वादाचे रुपांतर धक्काबुक्कीमध्ये झालं. या वादात कार्तिक याने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. याचा राग आल्यामुळे निलेश, सागर आणि धीरज या तिघांनी कार्तिक याला चौथ्या मजल्यावरून थेट इमारती खाली ढकलून दिलं. यात कार्तिकचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कार्तिकने निलेशच्या डोक्यात बाटली मारल्याने तो जखमी झाला आणि आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन गेलो, तिथून परत आल्यानंतर कार्तिक हा मृतावस्थेत इमारतीच्या खाली आढळला, असा बनाव या सर्वांनी रचला. मात्र कार्तिकच्या वडिलांनी या तिघांवर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कार्तिकच्या हत्येची कबुली दिली. याप्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. वाढदिवसाच्या पार्टीतच कार्तिकची हत्या झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
