बिहारच्या दोन बारावी नापास चोरट्यांकडून एटीमकार्ड क्लोन करून लाखो रुपयांची चोरी
बिहारच्या दोन बारावी 12 वी नापास चोरट्यांनी एटीमकार्ड क्लोन करून लाखो रुपयांची चोरी केली. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी यवतमाळ पोलीस बिहारमध्ये 8 दिवस मळकट टी शर्ट आणि बरमुडा घालून तपास करत होते.
यवतमाळ : बिहारच्या दोन बारावी 12 वी नापास चोरट्यांनी अनेक नागरिकांचे एटीम कार्ड क्लोन करून त्याद्वारे लाखो रुपये लंपास केले होते. त्याच आंतरराज्य टोळीला यवतमाळ पोलिसांनी बिहारच्या गया येथून सिनेस्टाईल अटक केली आहे. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी यवतमाळ पोलिसांनी बिहारमध्ये 8 दिवस मळकट टी शर्ट आणि बरमुडा घालून तपास केला.
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात एटीएमद्वारे पैसे काढले..
यवतमाळ शहरातील काही नागरिकांचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अचानकपणे त्यांच्या बँक खात्यातून एटीएमद्वारे परस्पर रक्कम काढल्याचं उघडकीस आले. हा प्रकार लक्षात येताच एटीम कार्ड धारकांनी तात्काळ बँकेत येत त्यांचे एटीम ब्लॉक केले. शिवाय पोलिसांत याबद्दल तक्रारी दाखल केल्या. जुलै महिन्यात यवतमाळातील श्रीकांत खराबे यांच्याकडे असलेल्या एसबीआयचे एटीएम कार्डमधून 10 हजार रुपये काढल्याचा एसएमएस त्यांना आला. खराबे यांनी त्याची सखोल चौकशी केली असता एटीएमचा वापर करीत त्यांच्या बँक खात्यातील एकूण रक्कमेतुन परस्पर कुणीतरी 30 हजार रुपये काढल्याचे त्यांना आढळून आले.
विशेष म्हणजे 31 जुलैपूर्वी यवतमाळ येथील सत्यसाई ज्योत मंगल कार्यालयाजवळच्या एसबीआयच्या एटीएम मधून त्यांनी शेवटचे पैसे काढले होते. त्यानंतर त्यांनी कुठलेही ट्रांजेक्शन केले नाही. त्याचप्रमाणे जितेश दवारे यांच्या बँक खात्यातून 13 हजार रुपये एटीएमद्वारे काढण्याचाही प्रकार उघडकीस आला. त्यानंतर 15 सप्टेंबर आणि 16 सप्टेंबर रोजीसुद्धा अशाच घटना घडल्या होत्या. त्यात साई सत्यजोत मंगल कार्यालया जवळील एसबीआय एटीम आणि अँग्लो हिंदी हायस्कूल जवळील एसबीआय एटीममध्ये इंटर्नल क्लीनर बसवून त्याद्वारे एटीमकार्ड क्लोन केले आणि त्याद्वारे डुप्लिकेट एटीएम तयार करून नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे लंपास केले होते.
काही एटीएम कार्ड धारकांनी यवतमाळच्या सत्यसाई ज्योत मंगल कार्यालयाजवळ असलेल्या एसबीआय एटीएमवरच ट्रांजेक्शन केले. त्यानंतर बँक खात्यातून परस्पर पैसे उडविल्याचे प्रकार लक्षात येताच खातेधारकांनी स्टेट बँक मुख्य शाखा येथे धाव घेतली. त्यानंतर तात्काळ एटीएम ब्लॉक करण्यात आले. या प्रकरणी एटीएम कार्ड क्लोनिंगचा संशय पोलिसांना बळावला. आणखी काही लोकांचेही अशाच पद्धतीने एटीएमद्वारे परस्पर पैसे काढल्याचे प्रकार उघडकीस आले. सुरुवातीला पोलिसांनी एटीएम क्लोन करून पैसे उडवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता आणि त्याच दुष्टीने तपास सुरू केला. मात्र, तपासात काहीच हाती लागत नव्हते.
एक एक करीत तब्बल यवतमाळ येथील साधारण 21 लोकांच्या तक्रारी यवतमाळ पोलिसांना प्राप्त झाल्या. त्या सर्वांची एकूण रक्कम 1 लाख 87 हजार आहे. या सर्व तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी आर्णी रोडवरील एसबीआय एटीएम सील केले आणि त्याच ठिकाणी असलेल्या सीसीटिव्हीद्वारे मागील काही महिन्यात त्या ठिकाणी आलेल्या लोकांच्या एक एक करीत हालचाली तपासणी सुरू केली. त्यादरम्यान त्यांना काही दिवसांपूर्वी दोन व्यक्ती एटीएममध्ये संशयास्पद हालचाली करीत असल्याचे दिसून आले.
आरोपीं चोरटे सुरुवातीला एटीएम परिसरात जावून रेकी करायचे आणि नंतर एटीम मशिन मास्टर key ने ओपन करून त्या ठिकाणी असलेल्या एटीएममध्ये इंटर्नल क्लीनर बसवून त्याद्वारे एटीम कार्ड क्लोन करीत आणि त्याद्वारे डुप्लिकेट एटीम तयार करून नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे लंपास करीत होते. एटीएममध्ये ग्राहक पैसे काढण्यास तिथे आल्यास त्यांच्यामागे उभे राहून एटीएमकार्डच्या मागे असलेला CVV नंबर नोट करायचे. त्याच दरम्यान त्यांनी एटीएम मशिनच्या आत बसवलेले इंटर्नल क्लीनरद्वारे चोरटे तात्काळ डुप्लिकेट एटीएम तयार करायचे आणि त्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन त्या डुप्लिकेट एटीएमद्वारे पैसे उडवायचे. त्यामुळे यवतमाळच्या व्यक्तीला त्याने एटीएम वापरले नसले तरी त्याच्या खात्यातून पैसे गायब झाल्याचे मेसेज यायचे. या सर्वामुळे एटीएम वापरणारे चिंतेत सापडले होते.
8 दिवस पोलीस वेशांतर करुन दबा धरुन होते..
या सर्वांसाठी पोलिसांनी तात्काळ दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू केला. ज्या ठिकाण ग्राहकाचे शेवटचे बँक ट्रांजेक्शन झाले त्या ठिकाणी असलेल्या सीसीटिव्ही कॅमेराद्वारे चोरट्यांच्या संशयास्पद हालचाली वरून त्यांचे फोटो घेतले आणि नंतर त्यांचे लोकेशन हुडकून काढले आणि त्यानंतर पोलिसांनी सहा जणांचे एक पथक तयार केले आणि थेट बिहारच्या गया जिल्ह्यात यवतमाळ पोलीस पोहचले. तिथे 8 दिवस पोलीस वेशांतर करून थांबले. यासाठी त्यांनी मळकट टी शर्ट आणि बरमुडा घालून त्या परीसरात मुक्काम ठोकला आणि तपास सुरू केला. जसे चोरटे त्यांच्या रडारवर आले तसेच पोलिसांनी दोघांना अटक केली.
महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
हे चोरट्यांनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड या पाच राज्यातदेखील एटीएम क्लोन करून पैशाची चोरी करीत होते. या प्रकरणी यवतमाळ पोलिसांनी बिहारच्या गया येथून सुकेशकुमार सिंग आणि सुधीरकुमार पांडे या दोघांना अटक केली. कोणाला संशय येवू नये म्हणून दोघे चोरटे साध्या भाड्याच्या खोलीत राहत होते, असेही पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी इंटर्नल एटीम स्कॅनर, हँड एटीम स्कॅनर आणि 15 एटीमसह बनावट एटीएम तयार करण्यासाठी लागणारे स्कीमर आणि 1 लाख 28 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे सायबर सेलचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी यांनी सांगितले आहे.