(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वर्ध्यात मृत कोरोना रुग्णाच्या अंगावरील सोन्याचा ऐवज लंपास; दीड महिन्यांनंतरही आरोपी मोकाट, कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत
कोरोनानं मृत्यू झालेल्या महिलेच्या शरीरावरील सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना वर्ध्यामध्ये घडली होती. परंतु, दीड महिन्यांनंतरही आरोपी मोकाट आहेत.
वर्धा : कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्याजवळील ऐवज अनेकांनी परत केला. पण कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंगावरील ऐवज लंपास केल्याच्या अनेक घटना उजेडात आल्या आहेत. कोरोनानं मृत्यू झालेल्या महिलेच्या शरीरावरील सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना वर्ध्याच्या सावंगी रुग्णालयात घडली. पण दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही चोरटा पोलिसांना गवसला नसल्यानं न्याय कधी मिळणार, असा प्रश्न मृत व्यक्तिंच्या कुटुंबियांकडून विचारण्यात येत आहे.
वर्ध्याच्या कारंजा इथले विकास नासरे आणि त्यांची पत्नी शालिनी नासरे यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला नागपूरला उपचार घेतल्यानंतर दोघांनाही 27 एप्रिलला सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी शालिनी नासरे यांच्या अंगावर 60 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत होती. पाच मे रोजी विकास नासरे यांनी डॉक्टरांना शालिनी यांच्या अंगावरील पोत काढून मागितली. पण डॉक्टरांनी दागिना नंतर मिळेल, असं उत्तरं दिल्याचं नासरे यांनी सांगितलं आहे. सहा मे रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास शालिनी यांचा मृत्यू झाला. सकाळी शवगृहात पाहिल्यानंतर शालिनी यांच्या अंगावर सोन्याचा दागिना दिसला नाही. याबाबत व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, चौकशी करून दागिना परत करतो, असं उत्तर दिल्याचं नासरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. पण दीड महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही अद्याप दागिना मिळालेला नसल्याचं कुटुंबिय सांगतात.
या प्रकरणात शालिनी नासरे यांचा मुलगा ऋषीकेश नासरे यांनी सावंगी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. पण दीड महिन्यांपासून पोलिसांना चोरटा गवसलेला नाही. घटनेच्या दिवशीच सीसीटीव्ही फुटेज बघून दुसऱ्या एका रुग्णाच्या नातलगावर मृत महिलेच्या मुलानं संशय व्यक्त केला आहे. सावंगी पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. याबाबत अनेकांचे जबाबही नोंदवण्यात आले. पण अद्याप पोलिसांना कोरोनाची लागण झालेल्या मृत महिलेच्या अंगावरील दागिना चोरणारा सापडला नाही. अद्याप तपास सुरु असून लवकरच आरोपीचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सदर प्रकरणाबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तपासात पोलिसांना सर्व सहकार्य केलं जातं असल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं आहे. चोरी कोणी केली हे शोधण्याच मोठं आव्हान पोलिसांपुढं उभं ठाकलंय. पोलिसांसमोर गुन्हेगार शोधण्याचं आव्हान असून मृताचे नातलग न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
"या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत आणि हॉस्पिटल प्रशासन त्यांच्या चौकशीला पूर्णपणे मदत करत आहे. जे काही निष्पन्न होईल ते पोलीस चौकशीतून निष्पन्न होईल", अशी प्रतिक्रिया सावंगी (मेघे) रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आचार्य विनोबा ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथे कोविड पॉझिटिव्ह असल्याने शालिनी नासरे यांना आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं अस होतं की, त्यांच्या अंगावरती दहा ग्रॅम सोन्याचे मनी आणि सहा ग्रॅम सोन्याचे लॉकेट होते. मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. त्यावेळी त्यांच्या अंगावरती दागिने मिळून आले नाही. त्यावरून सावंगी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 257 ऑब्लिक 2021 कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याबाबतचा तपास चालू आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न चालू असून लवकरच सदरचा गुन्हा उघड करण्यात येईल."
"माझी आई शालिनी विकासराव नासरे कोविड रुग्ण असल्यामुळे आचार्य विनोबा भावे सावंगी मेघे येथे दाखल झाली होती आणि सहा मे रोजी आईचा मृत्यू झाल्यामुळे आम्ही जेव्हा आईला बाकीच्या क्रिया कर्मासाठी घेऊन जात होतो. तेव्हा आम्हाला कळलं की, आईच्या अंगावरचे दागिने नाहीत. आईच्या अंगावरचे दागिने चोरीला गेले. जेव्हा आम्ही हॉस्पिटलकडे विचारपूस केली, तेव्हा आम्हाला कोणी उत्तर देत नव्हते. जेव्हा आम्ही सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघितलं, तेव्हा पेशंटचा एक रिलेटिव्ह तिथे आई गेल्यानंतर लुडबुड करत होता. जवळपास पाच मिनिटे तो तिथे होता. पीपीई किट घालून तर आम्हाला त्याच्यावर संशय आहे. जवळपास दोन महिने लोटूनही अजूनही तो संशयित आरोपी अजूनही मिळालेला नाही. तर इतके दिवस लोटूनही आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्याय कधी मिळेल, अशी आम्हाला शंका आहे. तरी आम्हाला त्वरित न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करतो.", अशी प्रतिक्रिया मृत महिलेच्या मुलानं दिली आहे.