Drugs Seized : मोठी बातमी! कोकेन तस्करी करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला अटक, न्यू इयर सेलिब्रेशनआधी पोलिसांची धडक कारवाई
Thane Crime News : ठाण्यात कोकेन तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला पोलिसांनी अटक केली असून आरोपीला 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. एका फरार आरोपीचा शोध सुरु आहे.
Thane Drugs Seized : नाताळ (Christmas) आणि नव्या वर्षाचा जल्लोष (New Year Celebration) उंबरठ्यावर आलेला आहे. ठिकठिकाणी हॉटेल, बार, ढाब्यांवर नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, बार, ढाब्यांवर मोठ्या पार्ट्या रंगतात. याच पार्ट्यात सामील होणाऱ्या नशेडींची झिंग पुरविण्यासाठी अंमली पदार्थ (Drugs) कोकेनची (Cocaine) पर्वणी घेऊन आलेल्या 33 वर्षीय नायजेरियन नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी ओकोरी इमॅन्युअल ब्राईट या नायजेरियन तरुणाला ठाणे गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकाने 19 डिसेंबरला मंगळवारी कोपरी परिसरातून अटक केली.
अंमली पदार्थविरोधी मोठी कारवाई
पोलीस पथकाने आरोपीकडून 12 लाख 51 हजार 360 रुपयांचं 31 ग्राम कोकेन हस्तगत करण्याची धडक कारवाई केली आहे. यामुळे नव्या वर्ष आणि नाताळाच्या जल्लोषात या कोकेनचा वापर होण्यापूर्वीच कोकेन आणि विक्री करणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. अंमली पदार्थाची तस्करी प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये त्याच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे गुन्हे शाखा युनिट-5 च्या पोलीस उपनिरीक्षक माने आणि पोलीस हवालदार रावते यांच्या पथकाला मिळालेल्या सुत्रांच्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे.
31 ग्राम कोकेनसह आरोपी गुन्हे शाखा युनिट-5 च्या जाळ्यात
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, एक नायजेरियन व्यक्ती कोकेन घेऊन येणार असल्याची माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकाला मिळाली होती. ठाण्यातील कोपरी येथील आनंदनगर चेकनाका सर्व्हिस रोडवर बस पार्कींगजवळ पोलिसांनी सापळा रचुन आरोपी ओकोरी इमॅन्युअल ब्राईट याला अटक केली. मंगळवारी सायंकाळी 5 ते सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हा नायजेरियन नागरिक नालासोपारा येथील प्रगतीनगर येथे वास्तव्यास होता. या आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याचेजवळ 31 ग्राम कोकेन सापडलं. अंमली पदार्थासोबत आरोपीकडे ओपो कंपनीचा मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर वस्तू असा 12 लाख 51 हजार 368 रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
रेव्ह पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर
नाताळ आणि नव्या वर्षाच्या जल्लोषासाठी विविध हॉटेल्स, ढाबे आणि फार्महाऊसवर नियोजित रंगणाऱ्या पार्ट्यांवर ठाणे पोलिसांची गुन्हे शाखेची तसेच अंमली विरोधी पथकाची करडी नजर आहे. या रेव्ह पार्ट्याना अंमली पदार्थ पुरविण्यासाठी ठाण्यात दाखल होणाऱ्या तस्करांना शोधण्यासाठी ठाणे पोलीस खबऱ्यांच्या नेटवर्कचा वापर करून अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळत आहेत. अशिवच कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट -5 द्वारे ठाण्याच्या कोपरीत मंगळवारी करीत एका तस्कराला अटक केली तर एका फरारी आरोपीच्या सहकाऱ्याचा शोध सुरु आहे.