द्राक्ष बागेतील कामासाठी जाणाऱ्या महिलांच्या जीपला भीषण अपघात, 3 ठार 9 जखमी
महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या कर्नाटकातील एका जीप (क्रुझर) गाडीला सांगोल्याजवळ अपघात झाला. त्यामध्ये तीन मजूर महिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला
सोलापूर : रस्ते अपघाताच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्याचं दिसून येत आहे. वाहनांची संख्या वाढली असून रस्ते मार्गाचेही विस्तारीकरण व रुंदीकरणाचे काम अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र, अपघाताच्या घटनांवर उपाय करण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याजवळ (solapur) भीषण अपघाताची (Accident) घटना घडली असून या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या कर्नाटकातील एका जीप (क्रुझर) गाडीला सांगोल्याजवळ अपघात झाला. त्यामध्ये तीन मजूर महिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर नऊ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सांगोला-जत या मार्गावर सोनंद गावाजवळ घडला. कर्नाटकातील अथणी येथील मजूर महिला पंढरपूर तालुक्यात द्राक्ष बागेतील कामांसाठी जीपमधून जात असताना जीप गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, या अपघाताची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर, अपघातातील मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिकांनीही तक्काळ घटनास्थळी येऊन मदतकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, गाडीचा अपघात भीषण असल्याने जागीच तीन महिलांचा मृ्त्यू झाला होता.
हेही वाचा