(Source: ECI | ABP NEWS)
Saquib Nachan : मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी साकीब नाचणची कहाणी, भिवंडीतील अधिकारी रामदास म्हात्रेंनी सांगितली थरारक आठवण
Who Is Saquib Nachan : साकीब नाचण हा पडघा-बोरिवली गावाच्या जंगल भागात दहशतवादी तरुणांना ट्रेनिंग देत असल्याचं एनआयएच्या पथकाने छापेमारी वेळी समोर आले होते.

ठाणे: दहशतवादी कृत्यांत सहभागी असलेल्या भिवंडी तालुक्यातील पडघा बोरिवली गावात रहाणाऱ्या साकीब नाचणचा मृत्यू झाला. दिल्लीच्या तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असतानाच ब्रेन स्ट्रोक होऊन उपपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या नंतर तब्बल 23 वर्षापूर्वी साकीब नाचनने 6 डिसेंबर 2002 रोजी मुंबई सेंट्रल रेल्वेच्या इमारतीतील रेस्टॉरंटमध्ये कट रचून बॉम्बस्फोट केला होता. त्यावेळी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेले रामदास म्हात्रे यांनी त्या घटनेला उजाळा देत बॉम्बस्फोटच्या आठवणीतील थरारक कहाणी एबीपी माझाला सांगितली
रामदास म्हात्रे हे पोलीस विभगातून 18 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. मात्र आजही त्या भयानक घटनेचे कथन करताना दहशदवाद या देशातून मुळासकट उखडून फेकण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विशेष म्हणजे साकीब नाचण (68) आणि निवृत्त पोलीस अधिकारी म्हात्रे दोघेही भिवंडी तालुक्यातील रहिवाशी आहेत. त्यामुळं बॉम्बस्फोटच्या तपासा दरम्यान घडलेल्या घडामोडीवर त्यांनी साकीब नाचणची कुंडलीच जगासमोर आणली.
बॉम्बस्फोटांमध्ये साकीब नाचणचं नाव समोर
निवृत्त पोलीस अधिकारी रामदास म्हात्रे सांगतात की, "मृतक साकीब नाचण हा स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) य संघटनेचा महाराष्ट्रातील प्रमुख सदस्य होता. त्यावेळी पोलीस प्रशासनाच्या गृह विभागाकडून सिमी संघटनेवर बंदी घातली होती. 27 जानेवारी 2003 सीएसटीहून कर्जतकडे जाणाऱ्या लोकल तसेच विलेपार्ले मार्केटमध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि 6 डिसेंबर 2002 रोजी मुंबई सेंट्रल रेल्वेच्या इमारतीतील रेस्टॉरंटमध्ये एकूण तीन बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळी घटनेच्या दिवशी मी दादर रेल्वे स्थानकात असतानाच मुंबई सेंट्रल रेल्वे हद्दीत बॉम्बस्फोट झाल्याचं कळालं. मी तत्काळ घटनास्थळ गाठून त्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणली. हॉटेलमधील बॉम्बस्फोट झालेल्या घटनास्थळाची पाहणी केली असता हॉटेलच्या एका कोपऱ्यात स्टीलच्या डब्यात दोघा आरोपींनी बॉम्ब ठेवल्याचं समोर आलं. त्या दोघांना एटीएसने अटक केल्यानंतर साकीब नाचणचे नाव समोर आले."
मुबंई सेंट्रल रेल्वे हद्दीत असलेल्या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटमध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावेळी राज्य आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणाचे अनेक पथकं त्याच्या माग काढत त्याला मुंबईतून अटक केली. त्याच्या अटकेनंतर आमच्या हद्दीत घडलेल्या बॉम्बस्फोटचा तपास माझ्याकडेच असल्याने त्याला 5 दिवसासाठी आमच्या ताब्यात देण्यात आले.
त्यावेळी तो शार्प माइंडचा असल्याचे दिसून आले. तो उच्चशिक्षित असल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी मुद्देशीर बोलायचा. तपासादरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्याच्या विरोधात एटीएस आणि रेल्वे पोलीस पथकानं समांतर तपास करून पुरावे गोळा केले होते. त्या पुराव्याच्या आधारे त्याला न्यायालयाने दोषी ठरवले होते. मात्र मुबंई सेंट्रल रेल्वे हद्दीत असलेल्या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटमध्ये मनुष्यहानी झाली नव्हती. त्यामध्ये काही प्रवाशी जखमी झाले होते.
रामदास म्हात्रे पुढे सांगतात की, तपासासाठी त्याच्या पडघा-बोरिवली गावात गेले असता त्याच्या समाजाची लोक तपासात सहकार्य करीत नव्हती. उलट पोलीस पथकावरच हल्ले करीत होते. मात्र इतर गावातील काही लोकांनी तपासादरम्यान सहकार्य केल्यानं धक्कादायक प्रकार समोर आला. साकीब नाचण हा या गावाच्या जंगल भागात दहशतवादी तरुणांना ट्रेनिंग देत असल्याचेही एनआयएच्या पथकाने छापेमारी वेळी समोर आले होते.
ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वच सुरक्षा यंत्रणा पडघा-बोरिवली गावावर करडी नजर ठेवून आहेत. आता या घटनेला 23 वर्ष उलटून गेली. सुरवातीला तो सिमी मध्ये कार्यरत असताना धार्मिक भावना भडकून काही तरुणांचा ब्रेनवाश करून हिंसाचार करण्यास प्रवृत्त करायचा. मात्र सिमी संघटनेवर बंदी आल्यानंतर तो एका दहशदवादी संघटनेच्या संर्पकात आला. तेव्हापासून तो देश विघातक कार्यवाया करू लागला होता. त्यावेळी त्याच्या घरातून देशाविरोधात कट कारस्थान रचल्याचे पुरावे केंदीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले होते.
निवृत्त पोलीस अधिकारी म्हात्रे यांनी सांगितलं की, साखळी बॉम्बस्फोटांचा खटला न्यायालयात एकत्रपणे चालवत असताना ज्यावेळी माझी साक्ष कोर्टात झाली त्यावेळी साकीब नाचण हा वकील न उभा करता स्वतःच खटल्यात आपली बाजू मांडत होता. मी न्यायालयात तपास आणि सरकारची बाजू मांडत असताना तब्बल दोन तास मला प्रश्न मग्रुरी पद्धतीनं विचारत होता. मात्र त्याला न्यायधीशानी तंबी दिल्यानंतर तो शांत झाला.
साकीब नाचणने अनेक तरुण जिहाद करण्यासाठी तयार केले. साकीब नाचण जरी मृतक झाला तरी देखील यापुढेही शासनानं या गावावर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत म्हात्रे यांनी व्यक्त केलं. अखेर साकीब नाचणसारख्या लोकांचा अंतही खूप भयानक होत असतो.
खळबळजनक बाब म्हणजे साखळी बॉम्बस्फोटांची शिक्षा भोगून कारगृहात सुटका झाल्यानंतर 9 डिसेंबर 2023 रोजी एनएनआय पथकाने साकीब नाचणसह गावातील 158 संशयित दहशदवाद्याना ताब्यात घेऊन अटक केलं होती. तर आधी याच गावातून पुणे येथील दहशतवादी मॉड्यूलर मधील तिघाजणांसह साकीब नाचण, त्याचा मुलगा आणि आकिब यास ताब्यात घेत कारवाई केली होती.
























