Siddhant Shirsat : संजय शिरसाटांच्या मुलावर विवाहितेकडून शारीरिक छळाचा आरोप; दानवे, इम्तियाज जलील संतापले, चाकणकरांच्या महिला आयोगाला धारेवर धरलं; म्हणाले...
Siddhant Shirsat : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट (Siddhant Shirsat) यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवत, सिद्धांत शिरसाट यांनी फसवणूक केल्याचा तसेच मानसिक व शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
मंत्रीपदाचा गैरफायदा घेतला जात असेल तर...
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने गैरफायदा घेऊन एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन देखील सहा महिने दखल न घेणे. कुणी कसा जगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, निदान या नात्यात तरी फसवणूक होऊ नये, अशा प्रकारची भूमिका आहे. कोणीही अशा प्रकारची फसवणूक केली तर निश्चितच त्याच्यावर कारवाई व्हावी. याबाबत मला डिटेल्स मिळाले तर मी नेहरूनगर पोलीस स्टेशनला चौकशी करेल. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांशी बोलेल. जर मंत्रीपदाचा गैरफायदा घेतला जात असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. मंत्रीपदाचा गैरवापर जो आजच्या घडीला सुरू आहे, असे मंत्री आम्ही याआधी कधीच पाहिलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
महिला आयोग आताही गप्प बसणार का?
तर माजी खासदार इम्तियाज जलील याबाबत म्हणाले की, दुर्दैव याचे वाटते की, एका मंत्राच्या मुलाने तिसरे लग्न केले आणि ज्या मुलीशी लग्न केले त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे. मग सगळे लोक गप्प का आहेत? आम्ही असं केलं असतं तर अख्खा मिडिया घरासमोर जमला असता. महिला आयोगाला आम्ही विनंती करणार आहे की, तुम्ही आताही गप्प बसणार आहात का? रुपाली चाकणकर ताईंना आम्ही हात जोडून विनंती करत आहोत की, ताई ती मुलगी मुंबईमध्येच राहते. तिला जाऊन भेटा आणि तिला न्याय द्या, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणातील संबंधित महिलेच्या दाव्यानुसार, संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाटांसोबत 2018 मध्ये त्या महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीनंतर त्यांची मैत्री झाली आणि चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेट झाली. याच फ्लॅटवर त्यांचे शारीरिक संबंध झाले. यानंतर सिद्धांत यांनी लग्नासाठी तगादा लावला. मात्र संबंधित महिला आधीच विवाहित होती. त्यामुळे सिद्धांत यांनी तिला भावनिक ब्लॅकमेल करुन, लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करेन, असा आग्रह धरला होता. यानंतर सिद्धांतच्या भावनिक आवाहनावर विश्वास ठेवून दोघांनी लग्न केलं, असा दावा संबंधित महिलेने केला आहे. तर त्याबाबत आपल्याकडे पुरावेही आहेत. या संबंधातून महिलेला गर्भधारणाही झाली, मात्र सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोपही महिलेने नोटीसमध्ये केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा























