दाम्पत्यासह चिमुरडीला चाकूचा धाक दाखवून दरोडा; 23 लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार
जळगाव शहरात चाकूचा धाक दाखवत दाम्पत्यासह मुलीला वेठीस धरलं आणि जवळपास 23 लाखांचा ऐवज लुटून पसार झाले. सदर प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
![दाम्पत्यासह चिमुरडीला चाकूचा धाक दाखवून दरोडा; 23 लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार Robbery at Mohadi Road area of jalgaon city robbers looted rs 23 lakh दाम्पत्यासह चिमुरडीला चाकूचा धाक दाखवून दरोडा; 23 लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/03220718/Jalgoun-Robbrey.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जळगाव : शहरातील मोहाडी रोड परिसरात दौलतनगर येथे सहा जणांनी बुधवार 3 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घरात घुसून चाकूच्या धाकावर 3 लाख रुपये रोख आणि 20 लाखांचे दागिणे असा एकूण 23 लाखांचा ऐवज लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐवज लुटल्यानंतर दरोडेखोरांनी दाम्पत्याचे मोबाईल खाली गेटजवळ ठेवून पोबारा केला.
दौलतनगर येथे पिंटू बंडू इटकरे (वय 35) हे पत्नी मनीषा आणि तीन वर्षांची मुलगी हरीप्रिया यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. इटकरे यांचा लोखंडी रॉडचा होलसेलचा व्यवसाय असून ट्रेडिंग कंपनी आहे. पिंटू इटकरे यांचे वडील सुप्रीम कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत.
पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास तोंडाला मास्कसह रुमाल बांधलेले तसेच हातात धारदार शस्त्र असलेले सहा जण लाकडी दरवाजा कटरने कापून आतील कडी उघडुन इटकरे यांच्या दुमजली घरात घुसले. घरात घुसताच सर्वांनी सर्व खोल्यांमध्ये चाचपणी केली. यानंतर इटकरे दाम्पत्य असलेल्या बेडरुममध्ये गेले. याठिकाणी त्यांनी इटकरे यांची पत्नी मनीषा हिला उठून तिचे तोंड दाबले. यानंतर पत्नी मनीषाने पिंटू इटकरे यांना उठवताच दरोडेखोरांपैकी एकाने पिंटू इटकरे यांच्या गळ्याला धारदार चाकू लावला. तसेच दुसऱ्या दरोडेखोराने इटकरे यांचे दोन्ही हात बांधले. आवाजाने इटकरे यांची मुलगी उठली आणि रडायला लागली. यानंतर दरोडेखोरांनी "मुलीला शांत बसवा, कुठलाही आवाज करू नका, नाहीतर जीव घेईन, घरात जे असेल ते काढून द्या." अशी धमकी दिली.
इतर दरोडेखोरांनी मनिषा यांनी सांगितल्याप्रमाणे कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकत दागिने तसेच तीन लाखांची रोकड आणि दागिने काढून घेतले. परत जाताना दरोडेखोरांनी दाम्पत्याचे मोबाईल तसेच घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर बॉक्सही काढून नेला. तसेच पोलिसांना प्रकार कळवला तर आम्ही पुन्हा येऊ तसेच तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकीही दिली. भयभीत झालेल्या दांपत्याने नातेवाईकांना प्रकार कळवत सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले. घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह तसेच ठसे तज्ज्ञांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिक्षकांनी दाम्पत्याकडून सविस्तर माहिती जाणून घेत संपूर्ण घरात पाहणी केली. तसेच अधिकार्यांसह कर्मचार्यांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस अधीक्षकांनी इटकरे दाम्पत्याला लवकरच दरोडेखोरांना जेरबंद करू असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)