पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे
Raigad Pen Crime : पक्षाच्या कामासंदर्भात चर्चा करायची आहे असं सांगून आरोपीने पीडित महिलेला बोलावून घेतलं आणि तिच्यासोबत लज्जास्पद चाळे करण्याचा प्रयत्न केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
रायगड : जिल्ह्यातल्या पेण शहरातील पोलिस स्टेशन शांतता समितीचे सदस्य आणि ठाकरे गटाचे युवा नेते शादाब भाई याने आपल्याच पक्षातील महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. पीडित कार्यकर्तीला पेण साई मंदिर कासार तलाव येथे भेटण्यास बोलावून तिच्यासोबत हे कृत्य केलं. पक्षाच्या कार्यक्रमाबाबत तुझ्याशी बोलायचे आहे अस सांगून तिच्या मनात लज्जा निर्माण होईल अशी वक्तव्ये करून या महिलेला छेडण्याचा प्रयत्न शादाब भाईने केला. त्यामुळे या परिसरात महिला असुरक्षित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्त्वाचं म्हणजे पेन पोलिसांनी जी शांतता समिती निर्माण केली आहे त्या समितीचा आरोपी सदस्य आहे.
पीडित महिला ही शादाब भाई या व्यक्तीला लहानपणापासून ओळखत असल्याने ती पेण शहरातील साई मंदिर येथे त्याला भेटण्यास गेली. मात्र त्यानंतर या नराधमाने अचानक या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य करून तिला छेडण्याचा प्रयत्न केला.
तुझं आणि तुझ्या मित्राचे अनैतिक संबंध आहेत. त्यामुळे तू माझ्या सोबत लोणावळा, नवी मुंबई, वाशी येथे चल. आपण तिकडे जाऊ आणि या बाबत सविस्तर मोकळेपणाने बोलू असं त्याने म्हटलं. त्यानंतर संतापलेल्या महिलेने याबाबत स्पष्ट भाषेत नकार दिला आणि या नराधमाच्या घरी हे कृत्य सांगण्यासाठी धाव घेतली. मात्र तिथेही या आरोपीच्या घरच्यांनी या महिलेची बदनामी करत लज्जास्पद शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला.
पीडित महिलेने थेट पेण पोलीस ठाणे गाठले आणि यासंबंधात आरोपी शादाब नजम भाई, त्याची पत्नी आणि त्याची आई यांच्या विरूद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 79, 352, 356(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंद केला. या गुन्ह्यातील अधिक तपास पेण पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संदीप बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिस करत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे पेण पोलिस स्टेशन शांतता समितीचे सदस्य असलेले शादाब भाई, पिडीत महिला आणि तिची मैत्रीण हे पेण ठाकरे गट शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत. दोघेही एकाच पक्षात काम करत असल्याने याबाबत महिला पुन्हा एकदा असुरक्षित असल्याचं विदारक वास्तव्य समोरं आलं आहे. अशा विकृत व्यक्तीच्या बाबतीत पक्षाचे वरिष्ठ कोणता निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.