(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रक्षकच निघाले भक्षक! लुटमारीच्या गुन्ह्यात पुण्याच्या तीन पोलिसांसह चौघांना बेड्या
Pune Police Crime News : लुटमारीची गुन्ह्यात पुणे पोलिसांतील तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. गणेश शिंदे, गणेश कांबळे, दिलीप पिलाने असे अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
Pune Police Crime News : लुटमारीची गुन्ह्यात पुणे पोलिसांतील तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. गणेश शिंदे, गणेश कांबळे, दिलीप पिलाने असे अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
नाशिक मार्गे मुंबई येथे हवाला मार्गे पाच कोटी रुपयांची रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या कार मालकाला नाशिक मुंबई महामार्गावरील हायवेदिवे येथील पेट्रोल पंपासमोर तिघा अज्ञात आरोपींनी कार अडवली. त्यानंतर कारमधील 45 लाख रुपयांची रोकड असलेली एक बॅग घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला असता, पुणे शहरातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत तीन पोलीस कर्मचाऱ्यासह चौघांना अटक केली आहे. गणेश शिंदे, गणेश कांबळे, दिलीप पिलाने असे अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर बाबूभाई राजाराम सोळंकी असे त्यांच्या चौथ्या साथीदाराचे नाव आहे.
तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हा आला उघडकीस..
औरंगाबाद येथील रामलाल मोतीलाल परमार हे आठ मार्च रोजी आपल्या ब्रिझा कारमधून नाशिक येथून व्यापाऱ्याची हवाला व्यवहारातील पाच कोटी रुपयांची रोकड विविध बॅगमध्ये घेऊन मुंबई येथे देण्यासाठी निघाले होते. त्याच दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील हद्दीत हायवेदिवे येथील पेट्रोल पंपावर दबा धरून बसलेल्या तीन इसमांनी कार थांबवून कारमधील 45 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी 10 मार्च रोजी रात्री उशिरा नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांच्या पोलीस पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे येथून बाबूभाई राजाराम सोळंकी यास ताब्यात घेतले. त्यानंतर बाबूभाईकडे कसून चौकशी केली असता, या गुन्ह्याची उकल झाली. त्याकडे केलेल्या चौकशीत पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी गणेश शिंदे, गणेश कांबळे,दिलीप पिलाने यांचा लुटमारीत सहभाग असल्याचे उघडकीस आले. घटनेची दिवशी या तिघा पोलिसांनी कार चालकास थांबवून 45 लाखांची रोकड पळविल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस पथकाने शिताफीने या तिन्ही फरार असलेल्या आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना पुण्यातच ताब्यात घेऊन अटक केली. यांनी असे अजून गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.
आरोपी पोलिसांना 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
घटनेच्या दिवशी रात्री 11 वाजता त्यांनी पुणे ते भिवंडी प्रवास करून पहाटेच्या चार वाजता तिन्ही पोलीस कर्मचारी गुन्हा घडलेल्या ठिकाणी दबा धरून बसले होते. विशेष म्हणजे गुन्हा करून माघारी पुन्हा पुणे येथे कामावर हजर झाले होते. या तिघांनी लुटीमधील प्रत्येकी नऊ-नऊ लाख रुपये आपापसात वाटून घेतल्याची माहिती समोर आली. यासर्व चारही आरोपींना रविवारी भिवंडीच्या विशेष न्यायालयात हजर केले असता, 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.