Pune Crime: ब्रेकअप झाल्यावर तरुणीने झिडकारलं, तरुणाने प्रेयसीवर पिस्तुल रोखली, गोळी मारणार तोच.. पुण्यात नेमकं घडलं काय?
पोलिस तपासात उघड झालं की, 2022 पासून तरुणी आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपूर्वी या दोघांचे ब्रेकअप झाले होते. त्यामुळे संतापून आरोपीने तरुणीवर हल्ल्याचा कट रचला.

Pune Crime: पुण्यात प्रेमसंबंधातून ब्रेकअप झाल्यानंतर एक तरुणाने आपल्या प्रेयसीवरच जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बाणेर भागात घडली आहे. डिलिव्हरी बॉयच्या वेषात आलेल्या आरोपीने तरुणीवर पिस्तुल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पिस्तुलातून गोळी न उडाल्याने तरुणी बचावली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 24 वर्षीय तरुणी एमबीए अभ्यासक्रम करत असून बाणेर भागातील एका खासगी कंपनीत इंटर्नशिप घेत आहे. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ती कंपनीच्या आवारात प्रवेश करत असताना आरोपीने तिला अडवलं. या आरोपीने घरपोच खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा वेश परिधान केला होता. तोंडाला मास्क लावल्याने सुरुवातीला तरुणीला त्याची ओळख पटली नाही.
तिला अडवल्यानंतर आरोपीने बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणीने नकार दिला. यामुळे संतापून त्याने आपल्या जवळील पिस्तुल काढले आणि तिच्या दिशेने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळेत गोळी सुटली नाही. घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड केली असता आरोपीने तिथून पळ काढला.
ब्रेकअपनंतर सूडभावना
पोलिस तपासात उघड झालं की, 2022 पासून तरुणी आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपूर्वी या दोघांचे ब्रेकअप झाले होते. त्यामुळे संतापून आरोपीने तरुणीवर हल्ल्याचा कट रचला. तिचा जीव घेण्यासाठी त्याने डिलिव्हरी बॉयचा वेश घालून कंपनीच्या आवारात प्रवेश केला होता.
पोलिसांनी आरोपीला अटक
घटनेनंतर घाबरलेली तरुणी थेट बाणेर पोलिस ठाण्यात दाखल झाली आणि तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने आरोपीला अटक केली. आरोपी एका खासगी कंपनीत नोकरी करत असून सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अशा घटनांनी तरुणाईतील असंतुलन आणि सूडभावना अधोरेखित होत असल्याची चर्चा सुरू आहे. प्रेमसंबंधात अपयश आल्यानंतर थेट हिंसक मार्गाचा अवलंब केल्याने समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पुण्यातील बाणेरसारख्या गजबजलेल्या भागात ही घटना घडल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
























