Pune Crime news : पुण्यातील वानवडीतील ठाकरे गटाच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात भीतीचं वातावरण
Pune Crime : पुण्यातील वानवडीतील ठाकरे गटाच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला. शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला आहे.
Pune Crime News : पुण्यातील (Pune) वानवडीतील ठाकरे गटाच्या (shivsena) कार्यालयावर (Crime) गोळीबार करण्यात आला. शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्ष इम्तियाज अफजल हुसेन शेख यांच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला आहे. ‘यहा के भाई लोग हम हैं, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे," म्हणत आरोपींना हा गोळीबार केला आहे. या गोळीबारामुळे पुण्यातील वानवडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पूर्ववैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणवणार्याने हातात पिस्तुल घेऊन गोळीबार केला आहे. मुख्य रस्त्यावर येऊन हातात पिस्तुल घेऊन यातील एकाने ‘यहा के भाई लोग हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे," असे बोलून पिस्तुलातून गोळीबार करुन दहशत निर्माण केली. इम्तियाज अफजल हुसेन शेख या 37 वर्षीय यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. अतिक शेख, सादिक शेख, हुसेन कादिरी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार यांचा भाऊ इम्रान आणि सादीक शेख याचा भाऊ शब्बीर कादरी यांच्यात 27 डिसेंबरला भांडणं झाली होती. या भांडणाचा बदला घेण्यासाठी त्यांनी कार्यालयाच्या दारावर लाथाबुक्क्या मारल्या. त्यानंतर रागातूनच हवेत गोळीबार केला. ठाकरे गटाच्या कार्यलयावर गोळीबार झाल्याने ठाकरे गट आक्रमक भूमिका घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पुण्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख
सध्या पुण्यात क्षृल्लक कारणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. क्षुल्लक कारणावरुन भांडणं होतात. त्याच्या रागातून खून आणि हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याबरोबरच बलात्कार, सायबर क्राईम आणि लैंगिक छळांच्या घटनेत देखील वाढ होत आहे. कोयता गॅंग आणि चुहा गॅंग सक्रिय आहेत. त्यातील कोयता गॅंगने सध्या पुण्यात धुमाकूळ घातला आहे. परिसरातील प्रत्येक नागरिकाला या गॅंंगमुळे घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. पोलिसांनाही तक्रारी देऊन कोणताही बंदोबस्त केला जात नसल्याचं चित्र आहे. पोलीस या प्रकरणाचं गांभीर्य कधी ओळखणार?, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. या गॅंंगचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. त्यातील एकाला पोलिसांनी कालच (29 डिसेंबर) जेरबद केलं आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात पोलीस आयुक्त रितेशकुमार नव्याने रुजू झाले आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे.