Pune crime news: संतापजनक! 13 वर्षीय मुलीला बिकिनीवर ऑडिशन द्यायला सांगितलं अन् लैंगिक अत्याचार केला
Pune crime news : एका प्रसिद्ध उद्योजकाने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Pune crime news : एका प्रसिद्ध उद्योजकाने ऑडिशन घेण्याच्या (Pune crime) बहाण्याने 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील चाकण परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र दगडू गायकवाड असं आरोपी उद्योजकाचं नाव आहे. गायकवाड हा पीडित मुलीच्या घरी आला होता. त्याने 13 वर्षीय मुलीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर मुलीचं ऑडिशन घ्यायचं आहे, असं सांगून मुलीच्या आई-वडिलांना घराबाहेर जाण्यास सांगितलं. आई-वडील घराबाहेर गेल्यानंतर ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने मुलीला कपडे काढायला सांगितले. मुलगी लहान असल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर या संदर्भात कोणाला सांगितलं तर मारुन टाकेन, अशी धमकीही दिली. अत्याचार करुन आरोपी गरातून निघून गेला.
मुलीनेच सांगितला आई-वडिलांना घडलेला प्रकार
आरोपी घराबाहेर गेल्यानंतर आई-वडील घरात आले त्यावेळी मुलगी घाबरलेली दिसली. मुलीने झालेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी थेट पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पुण्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ
पुण्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाल्याचं दिसत आहे. दररोज नवनवीन प्रकरणं समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी महिलेला कॉफीमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. हॉटेल व्यवसायात भागीदारी करण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. खराडी भागात ही धक्कादायक घटना घडली होती. पीडित महिलेने याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. अजयसिंग विजयसिंग ठाकूर असं 31 वर्षीय आरोपीचे नाव होतं. त्याता पोलिसांनी अटक केली होती. आरोपीची कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली होती. दुसऱ्या नोकरीच्या शोधात असताना त्याची एका मित्रमार्फत तक्रारदार महिलेशी ओळख झाली. त्यांची जवळीक वाढत होती. मैत्री असल्याने त्यांनी व्यवसायाबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. तक्रारदार महिलेचा केटरिंगचा व्यवसाय होता. त्यांनी दोघांनी हॉटेल सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.