(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रेमकहाणीचा 'सैराट' अंत! प्रेमाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीला संपवलं
Parbhani Crime News : प्रेम विवाहाला विरोध करत आईवडिलांनी मुलीला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
परभणी : प्रेमकहाणीचा सैराट अंत झाल्याची आणखी एक घटना महाराष्ट्रात समोर आली आहे. महाराष्ट्रातील परभणीमध्ये ऑनर किलिंगच्या (Honour Killing) धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. मुलीने दुसऱ्या जातीतील मुलासोबत लग्न केले होते, मात्र आईवडिलांचा याला विरोध होता. मुलीच्या प्रेमविवाहाला विरोध (Love Marriage) असल्याने आईवडिलांनी पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे. परभणीच्या पालम तालुक्यामधील ही घटना समोर आली आहे.
प्रेमाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीला संपवलं
मुलीने इतर जातीतील मुलावर प्रेम करून लग्न करण्याचा निर्धार केला. मात्र तिच्या घरच्यांना हा निर्णय मान्य नसल्याने तिची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने केवळ काही नातेवाईकांना बोलावून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा ऑनर किलिंगचा प्रकार आता समोर आला आहे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यामधील नाव्हा या गावात घडला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकूण आठ जणांवर हत्या, पुरावा नष्ट करणे या कलमाखाली पालम पोलिंसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
परभणीच्या पालम तालुक्यातील नाव्हा येथील 19 वर्षीय युवतीचे गावातील दुसऱ्या जातीतील युवकासोबत प्रेम संबंध होते. त्यांनी लग्न करण्याचा निश्चय ही केला. मात्र, मुलीने आंतरजातीय विवाह करू नये, म्हणून पालकांनी विरोध केला. तरी देखील तरुणी लग्न करण्यावर ठाम होती. त्यात 21 एप्रिल रोजी रात्री 10 ते 22 एप्रिलच्या पहाटे दरम्यान नाव्हा येथे तरुणीच्या आई-वडीलांनी जीवे मारले. आई-वडीलांनीच पोटच्या तरुणीला ठार केलं.
आठ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल
यानंतर, आरोपी आईवडिलांनी त्याच रात्री कोणालाही थांगपत्ता लागू न देता भावकीतील निवडक व्यक्तींना सोबत घेतलं. भावकीतील व्यक्तींना सोबत घेऊन संगनमत करत हत्या केलेल्या तरुणीचा मृतदेह नाव्हा येथील स्मशानभूमीत जाळून पुरावा नष्ट केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पालम पोलिसांत पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत तरुणीचे आई, वडील आणि भावकीतील इतर सहा जण अशा एकूण आठ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील हे करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :