दरोड्यात पळवलेल्या 9 किलो 600 ग्रॅमपैकी अडीच किलो सोनं जप्त, पाच जणांना अटक
वर्ध्याच्या मुख्य मार्गावर असलेल्या मुथ्थूट फिनकॉर्न फायनान्स कंपनीच्या कार्यालयात बंदूक, चाकुच्या धाकावर दरोडा घालण्यात आला. त्यावेळी कुरिअर बॉय असल्याचं सांगून प्रवेश करत बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून सोनं आणि रोख पळवली.
वर्धा : वर्ध्याच्या मथ्थूट फिनकॉर्न फायनान्स कंपनी कार्यालयात पडलेल्या दरोड्याचा अवघ्या सहा तांसात गुन्ह्याची उकल करत बारा ते चौदा तासांत आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलयं. कर्जबाजारीपणामुळं कट रचून हा गुन्हा घडल्याचं उघडकीस आलयं. दरोड्यात पळविलेल्या 9 किलो 600 ग्रॅम सोन्यापैकी अडीच किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे.
वर्ध्याच्या मुख्य मार्गावर असलेल्या मुथ्थूट फिनकॉर्न फायनान्स कंपनीच्या कार्यालयात बंदूक, चाकुच्या धाकावर दरोडा घालण्यात आला. त्यावेळी कुरिअर बॉय असल्याचं सांगून प्रवेश करत बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून सोनं आणि रोख पळवली. पोलिसांनी माहिती मिळताच तातडीनं चौकशीची चक्र फिरवली. त्यात संशयामुळं शाखा व्यवस्थापक महेश श्रीरंग यांची चौकशी केली. त्यानं यवतमाळ इथल्या कुशल आगासे यानं शस्त्राच्या धाकावर हा गुन्हा केल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यावरून पोलिसांनी पुढील सूत्र वेगानं फिरवत पोलिसांची चमू यवतमाळ जिल्ह्यात पोहोचली. तिथं पोलिसांनी करळगाव जंगल शिवारातून चार जणांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी अटक केलेल्यांची नावं महेश श्रीरंग, कुशल आगासे, मनीष घोळवे, जीवन गिरडकर, कुणाल शेंद्रे अशी आहे.
पोलिसांनी दोन किलो 500 ग्रॅम वजनाचं सोन, सहा मोबाईल, पिस्टल, कार असा चार कोटी 75 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रकरणात व्यवस्थापक महेश श्रीरंगच सूत्रधार निघाला. इतर चौघे त्याचे सहकारी आहे. कुशल आगासे यानं बंदुकीच्या धाकावर हा दरोडा घातला. तो पायदळ फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आला. त्याचे दोन सहकारी सालोड शिवारात वाट बघत होते. घटनेनंतर कुशल सालोडला गेला आणि तिथून सहका-यांसह पसार झाला. व्यवसायातील अपयशानं आलेल्या कर्जबाजारीपणामुळं हा दरोडा घातल्या गेल्याचं पोलिसांच्या तपासात पुढं आलंय. ठेवीदारांनी घाबरून न जाता यंत्रणेवर विश्वास ठेवावा. ठेव सुरक्षित असल्याचं पोलिस अधीक्षकांनी सांगितलं.
सुमारे दोन आठवड्यांपासून गुन्ह्याचा कट रचल्याचं सांगण्यात येतयं. पोलिसांनी कौशल्य पणाला लावत अवघ्या काही तासांत घटनेचा छडा लावलाय. यामध्ये आणखी कुणी सहभागी आहे काय, याचा शोध सुरू आहे. घटनेचा तपास करणा-या चमूला 35 हजारांचं बक्षिस देणार असल्याचं पोलिस अधीक्षकांनी जाहीर केलं.