नाशिकमध्ये वन्य प्राण्यांच्या तस्करीचे 'स्लीपर सेल' नेटवर्क, मास्टरमाईंड नेमका कोण?
Nashik News Update : गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी भाग व वनपट्टे असलेल्या परिसरात वन्यजीवांची हत्या करून अवयवांची विक्री करण्यात येत घटना सातत्याने समोर आहेत.
Nashik News Update : नाशिकच्या दिंडोरी परिसरात ननाशी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत बिबट्याच्या कातडीच्या तस्करी करणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकीकडे इगतपुरी वनपथकाने आठ दिवसांपूर्वीच मोठी कारवाई केल्यानंतर आज पुन्हा दोघा संशयितांना बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी जात असताना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर जवळील अंबोली फाट्यानजीक मोठ्या शिताफीने बिबट्याच्या कातडीची तकस्करी करणाऱ्यांना पकडण्यात आले होते. त्यानंतर बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या स्लीपर सेल्सना न्यायालयात हजर केले असता त्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर पुन्हा दिंडोरी परिसरात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या स्लीपर सेल्सना ताब्यात घेण्यात आले आहे.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी-नाशिक- ननाशी वनपरिक्षेत्राच्या पथकाने बनावट ग्राहक तयार करून संयुक्त सापळा रचला. पेठ महामार्गावर ननाशी वनपरिक्षेत्रातील आंबेगण फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये संशयित मोतीराम महादू खोसकर, सुभाष रामदास गुम्बाडे यांना बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी आलेल्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. मात्र यामध्ये मास्टरमाइंडचा हात असल्याचा संशय वनविभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार या म्होरक्याचा शोध वनविभागाकडून सुरु आहे.
दरम्यान, मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र आधिकारी केतन बिरारीस, वन परिमंडळ आधिकारी भाऊसाहेब राव आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे. संशयितांकडून बिबट्याची संपूर्ण कातडी जप्त करण्यात आली असून पुढील तपास ननाशी वनपरिक्षेत्र आधिकारी सविता पाटील करीत आहे.
स्लीपर सेलचे नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी भाग व वनपट्टे असलेल्या परिसरात वन्यजीवांची हत्या करून अवयवांची विक्री करण्यात येत घटना सातत्याने समोर आहेत. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, मोखाडा, पेठ आदी परिसरातील नागरिकचं यात सक्रिय असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे. जंगलव्याप्त परिसर आल्याने वनप्राण्यांचं वास्तव्य आहे. याचा फायदा घेऊन वनक्षेत्रातील मृत, अशक्त बिबट्या अथवा एखाद्या प्राण्याला मारून त्याची कातडी व इतर अवयव विकण्यासाठी 'स्लीपर सेल' कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दरम्यान नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, पेठ, मोखाडा आदी भागातील असेलेले स्लीपर सेल एकमेकांना ओळखत नसले तरीही तस्करीसाठी एकत्र आलेल्या स्लीपर सेलचे हे 'नेटवर्क' असल्याचे प्राथमिक दृष्ट्या पोलिसांच्या तपासातून दिसून आले आहे.