Nashik Crime Mukesh Shahane: अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणेंच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप, महिलेकडून थेट आत्मदहनाचा प्रयत्न; नाशिकमध्ये खळबळ
Nashik Crime Mukesh Shahane: कामटवाडे परिसरात अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या कार्यकर्त्यांनी दहशत माजवल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Nashik Crime Mukesh Shahane: नाशिक महापालिकेच्या निवडणुकांना (Nashik Municipal Corporation Election 2026) अवघे काही दिवस उलटताच शहरात उघडपणे गुंडगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामटवाडे परिसरात अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांच्या कार्यकर्त्यांनी दहशत माजवल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच जणांनी नगरसेवक मुकेश शहाणे आणि विनोद मगर यांच्या नावाचा संदर्भ देत परिसरात खुलेआम धमक्या दिल्या व नागरिकांना मारहाण केली. या घटनेबाबत अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. मनपा निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी या टोळक्याने कामटवाडे परिसरात धुडगूस घातला. काही नागरिकांना मारहाण करत असताना मार्गावरून जाणाऱ्या एका दाम्पत्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त टवाळखोरांनी त्यांनाच लक्ष्य करत दोघांनाही बेदम मारहाण केली.
Nashik Crime महिलेकडून आत्मदहनाचा प्रयत्न
हाणामारीदरम्यान संबंधित व्यक्तीला मारले जात असताना त्याची पत्नी मध्ये पडली. आरोपींनी महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत छातीत व पोटात गंभीर जखमा केल्या. तसेच तिच्या ओढणीच्या माध्यमातून विनयभंग केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून हा प्रकार थांबवला. जखमी महिलेला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र घटनेनंतर पोलीस तक्रार घेत नसल्याने मारहाण झालेल्या महिलेच्या सासूने पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मारहाण करणारे संशयित हे नगरसेवक मुकेश शहाणे यांचे कार्यकर्ते असून, विनोद मगर यांच्या टोळीशी संबंधित असल्याने तक्रार घेण्यास आणि पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे संबंधित महिलेचे म्हणणे आहे.
Nashik Crime : चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान,याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात जखमी महिलेच्या फिर्यादीवरून अमोल पाटील याच्यासह चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या किरकोळ भांडणांतर महिलेने हा प्रकार झाल्याचे पोलिसांना सांगितले. अंबड पोलिसांकडून अमोल पाटील याला अटक करून पुढील तपास करण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























