Nashik News : शेअर मार्केटचे आमिष दाखवून दोन कोटींची फसवणूक, आठवड्याभरातील दुसरी घटना
Nashik News : शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कोट्यवधींचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची दोन कोटी 13 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
Nashik News नाशिक : शेअर मार्केट ट्रेडिंगमधून (Stock market trading) चांगल्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून शहरातील व्यावसायिकास तब्बल तीन कोटी 70 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. आता असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एकाची दोन कोटी 13 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याच आठवड्यात ही दुसरी घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीने काही महिन्यांपूर्वी डिमॅट खाते सुरू केले होते. त्यांना शेअर्स मार्केटमधील गुंतवणुकीचा अनुभव नव्हता. त्यामुळे त्यांनी याबाबत ऑनलाइन माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी फिर्यादी यांना मोबाईलवर संपर्क साधला आणि शेअर बाजारात गुंतवणुकीचा सल्ला देताना शेअर मार्केटमधून जादा परतावा पाहिजे असल्यास चांगली गुंतवणूक करण्याचे सांगितले.
शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे दाखवले आमिष
फिर्यादीने ऑनलाइन संपर्कात आलेल्या एका कंपनीमार्फत शेअर्समध्ये 25 हजार रुपयांची गुंतवणूक केली. परंतु त्यामध्ये त्यांना आर्थिक परतावा मिळाला नाही. त्यावेळी संशयिताने त्यांना 12 लाखांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चार-पाच दिवसांत पाच कोटींचा जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.मोबदल्यात 89 हजार रुपये कमिशन देखील मिळेल, असेही संशयिताकडून फिर्यादींना आमिष दाखवण्यात आले.
वर्ष उलटून देखील परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे उघड
फिर्यादीने सुरवातीला दोन लाख रुपये गुंतवले. त्यावर संशयितांनी अडीच कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर फिर्यादीने टप्प्याटप्प्याने दोन कोटी गुंतविले आहेत.मात्र जादा परताव्याचे पैसे परत मागितल्यावर संशयितांनी टाळाटाळ केली. वर्ष उलटून देखील परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीला लक्षात आले.
सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी संशयित समीर उपाध्याय, अभिवन मिश्रा, अभिषेक शर्मा, तिलक जोशी, आदित्य रस्तोगी यांसह दोन बँक खातेधारकांविरुद्ध सायबर कलमान्वये नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहे.
व्यावसायिकाची पावणे चार कोटींची फसवणूक
याच आठवड्यात फसवणुकीचा दुसरा प्रकार घडला. नाशिकमधील व्यावसायिकाला संशयितांनी साडेतीन कोटी गुंतवल्यास तुम्हाला थेट साडेसात कोटी मिळतील, अशी स्कीम सांगितली. आम्हीही असेच पैसे गुंतविले आहेत. त्याचा आम्हाला इतक्या रुपयांचा फायदा झाला आहे. हे खात्रीशीर आहे. बिनधास्त पैसे टाका अन् कमवा, असे मेसेज व्यावसायिकाला करण्यात आले. यामुळे व्यावसायिकाने सायबर भामट्यांवर विश्वास टाकला आणि त्या स्कीममध्ये पावणे चार कोटी गुंतवले. त्यानंतर साडेसात कोटी रुपये काढताना व्यावसायिकाला अडचण आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटात मोठे फेरबदल, विजय करंजकरांची उमदेवारी निश्चित?